अकोला: जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक येत्या १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी पंचायत समित्यांच्या विशेष सभा घेण्यात येणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी बुधवारी काढली असून या विशेष सभांमध्ये पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे दिवळीपूर्वीच जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये राजकीय फटाके फुटणार आहेत.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची अडीच वर्षांच्या कालावधीची मुदत संपली असून, पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सभापती व उपसभापती पदांची निवड करण्याकरिता निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबर रोजी पंचायत समित्यांच्या विशेष सभा आयोजित करण्यात येत असल्याची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ऑक्टोबर रोजी काढली आहे.
पंचायत समित्यांच्या या विशेष सभांमध्ये पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सभापती व उपसभापतीं पदांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून, विशेष सभांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची नेमनुकही करण्यात आली आहे. सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीमुळे दिवळीपूर्वीच जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये फटाके फुटणार आहेत.सभापती पदांच्या आरक्षणाची आज सोडत!जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत गुरुवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कोणत्या पंचायत समितीचे सभापतीपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, याबाबतची उत्कंठा आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे.