राजेश शेगोकार । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रमही १५ मेपासून सुरू झाला असून, ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्षांची निवड होणे अपेक्षित होते; मात्र काही कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या असून, अखेर २६ व २७ सप्टेंबर असे सलग दोन दिवस अकोला जिल्हय़ाचे निवडणूक निर्णय अधिकारी आमदार राजेशकुमार कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत अकोला महानगर व जिल्हा अध्यक्षांची निवडणूक घ्यायची की सर्वाधिकार प्रदेश काँग्रेस कमिटीला देऊन आपसातील वादांची ‘झाकली मूठ’ कायम ठेवायची, हा निर्णय होणार असल्याचे या बैठकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत निवडणुकीसाठी काँग्रेसने सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण करून प्रदेश काँग्रेसला सूचित केले होते. सदस्य नोंदणीनंतर निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र ठरविण्यात आलेल्या १ हजार ८४१ सदस्यांची यादी ६ ऑगस्ट रोजी प्रकाशित केली होती. प्रदेश निवडणूक अधिकारी माजी खासदार दीपक जोशी यांनी सदस्य नोंदणीला मंजुरी दिली. अकोल्यात २३ हजार ४५0 सदस्य नोंदणी झाली असून, त्यापैकी १ हजार ८४१ सदस्य पात्र ठरविण्यात आले आहेत. यामधूनच काँग्रेसच्या विविध पदाधिकार्यांची निवड होणार आहे. स्थानिक स्वराज्य भवनात होणार्या बैठकीत आ. राजेशकुमार हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ‘बीआरओ’ येथे उपस्थित राहणार आहे. या पृष्ठभूमीवर अकोल्यातील काँग्रेसच्या वतरुळात राजकारण तापले आहे. अकोल्यात काँग्रेसची महापालिका व नगरपालिका निवडणुकीत कामगिरी सुमार राहिली. निवडणुकीपूर्वीच काही नगरसेवकांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. यादरम्यान, महानगर अध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी यांच्याविरोधात काँग्रेसची दुसरी फळी जाहीरपणे विरोधात उभी ठाकली होती. काँग्रेसमधील हा असंतोष अजूनही कायमच आहे. त्यामुळे पक्षांतर्गत निवडणुका झाल्याच तर चौधरी यांच्यावर मात करण्यासाठी या फळीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे निवडणुकीतील मतविभाजन टाळून निर्णयाचा अधिकार प्रदेश कमिटीला देण्याचा एका ओळीचा ठराव घेण्याचाही प्रयत्न होऊ शकतो व हाच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी दुसरा गटही तेवढाच आक्रमकपणे समोर येण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे.
पक्षांतर्गत निवडणूक फार्स ठरणार का?१५ मेपासून सुरू झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी इच्छुकांनी सदस्य नोंदणी करून निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, महानगरासाठी निवडणूक घेण्यात यावी, असा काही पदाधिकार्यांचा आग्रह आहे, तर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी बूथनिहाय नोंदणीचा टक्का कमी असल्याने निवडणुकीची शक्यता कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे महानगर अध्यक्षपदाचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सोपविण्याचाही ठराव घेतला जाऊ शकतो. असे झाले तर पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आग्रही असलेल्या राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या धोरणाच्या विरोधात पक्षाची भूमिका असल्याचे समोर येऊन पक्षांतर्गत निवडणूक हा फार्सच ठरण्याची चिन्हे आहेत.
अध्यक्ष पदासाठी स्पर्धा महानगर अध्यक्ष पदासोबतच जिल्हाध्यक्ष पदासाठीही पक्षात स्पर्धा आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना एक्सटेन्शन देण्याऐवजी तसेच महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी यांना त्यांच्या नियुक्तीपासून असलेल्या विरोधाचा विचार करता नव्या नेतृत्वाच्या हातात पक्ष देण्याबाबत काँग्रेस कार्यकर्ते आग्रही आहेत. जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रकाश तायडे, डॉ. सुधीर ढोणे यांच्यासह बाबाराव विखे पाटील तर महानगरअध्यक्ष पदासाठी पुन्हा बबनराव चौधरी तसेच राजेश भारती यांच्या नावाची चर्चा आहे.