१४ जानेवारी रोजी हाेणारी निवडणूक कोरम पूर्ण होत नसल्याने व उमेदवारी अर्जच न आल्यामुळे रद्द करण्यात आली. ही निवडणूक पुन्हा सात-आठ दिवसांत होणार असल्याची माहिती आहे. नगरपरिषदेत भाजप शेतकरी सहकार पॅनल व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या सत्ताधारी पक्षाकडे १७ पैकी १२ सदस्य आहेत. पैकी एका सदस्याचे नुकतेच निधन झाले आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्यासह मुख्याधिकारी पवार उपस्थित होते. नगराध्यक्ष जयश्री पुंडकर उपस्थित होत्या. परंतु, सत्ताधारी पक्षाच्या कोणाला किती जागा याबाबत सहमती न झाल्याने अनेकांनी अनुपस्थित राहणेच योग्य समजले, अशी गोटातून माहिती मिळाली. त्यामुळे विषय समित्यांची निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे वरून जरी आलबेल दिसत असले तरी आतून सर्व सुरळीत नसल्याचे चित्र आहे. याबाबत शेतकरी सहकार पॅनलचे ज्येष्ठ न. प. सदस्यांना याबाबत विचारणा केली असता आमच्या पॅनलच्या विद्यमान सदस्या शारदा आसरे यांचे निधन झाल्याने निवड समितीच्या सभेला हजर राहू शकलो नाही, असे सांगितले तर भाजपाच्या नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
तेल्हाऱ्यात न.प.च्या विषय समितीची निवडणूक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:21 AM