अकोला: विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने एक जागा कायम ठेवत मित्रपक्ष शिवसेनेलाही विजयी केल्यामुळे महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण असणे साहजिकच आहे; मात्र या निकालासाठी मताधिक्यासाठी द्यावी लागलेली झुंज ही भाजपाला इशारा देणारी ठरली आहे.अकोल्याच्या राजकारणाचा विचार केला तर गत तीन दशकांपासून भाजपाचा प्रभाव राजकारणावर आहे. नेते, महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते या सर्वांच्या अपेक्षांना तोंड देतानाच सर्वांना सत्तेत सामावून घेताना मोठी कसरत नेतृत्वाला करावी लागते. त्यामुळेच काही सत्ताकेंद्रांसाठी ठरलेलीच नावे कायम राहतात. एखाद दुसरा बदल केलाच तर त्याला दीर्घकाळ संधी मिळेल, अशी स्थिती नाही. परिणामी, भाजपामध्येच ‘पठारावस्था’ आली आहे. त्यामुळेच आलेला गाफीलपणा अन् अतिआत्मविश्वास या पक्षाला झुंज देण्यास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट होते. पराभवाची कारणे जशी अनेक असतात, तशी विजयाचीही कारणे आहेतच; मात्र जेव्हा विजयासाठी झुंज द्यावी लागते, त्यावेळी मात्र कारणांचा अर्थ समजून घेणे गरजेचे असते. गत पाच वर्षांच्या काळात अकोल्यात विकास कामे झाली, अजूनही सुरूच आहेत; मात्र त्यांच्या दर्जाबद्दल होणारी ओरड, त्याची घेतली जाणारी दखल अन् प्रत्यक्षातील कारवाई यामध्ये खूप अंतर आहे. हे अंतर जनतेने दुर्लक्षित केले नाही. त्यामुळेच अकोला पश्चिम, अकोट व मूर्तिजापूर मतदारसंघांत विजयासाठी भाजपाला शेवटच्या फेरीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. याच मतदारसंघात भाजपाला सहज विजय मिळत आला आहे, हे विशेष. दुसरे म्हणजे पक्षातील छुपी गटबाजी, चुकीच्या गोष्टींची नेत्याकडून होणारी पाठराखण अशा अनेक मुद्यांच्या ऊहापोह करता येईल. मतदारांनी दिलेला इशारा व त्यामागील अर्थ लक्षात घेऊन पुढील कार्यकाळात सुधारणा झाली तर आजचे ‘अच्छे दिन’ कायमच ‘अच्छे दिन’ राहतील, अन्यथा ये पब्लिक है...!४अॅड. प्रकाश आंबेडकरांना अकोल्याने नेहमीच ताकद दिली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता, प्रत्येक वेळी विधानसभेत प्रतिनिधित्व गत नऊ लोकसभा निवडणुकांपैकी १९९८ व १९९९ या दोन निवडणुकांमध्ये अॅड. आंबेडकरांना खासदार करणाऱ्या जिल्ह्यातच यावेळी विधानसभा निवडणुकीत त्यांची पाटी कोरी राहिली आहे. खरे तर ‘वंचित’साठी हा धक्का आहे.
वंचित’च्या निमित्ताने उभ्या महाराष्टÑात मतांच्या धु्रवीकरणासोबत सत्तेत सहभाग होईल, असे आश्वस्त करणारे वातावरण तयार झाले होते. त्याला मोठा सेटबॅक बसला आहे. त्यामुळे आता कोºया झालेल्या पाटीवर ‘वंचित’च्या माध्यमातून ते कोणते मुळाक्षरे गिरवितात, यावरच पक्षाची व वैचारिक चळवळीची दिशा ठरणार आहे.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आता तरी धडा घेईल का?
भाजपा लाटेने गलितगात्र झालेल्या काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी अपवाद वगळता त्यांच्या उमेदवारांनी दिलेली लढत कार्यकर्त्यांना उभारी देणारी आहे. त्यामुळे आता या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतून मनोबल देत त्यांच्या अपेक्षांचाच विचार केला गेला, तरच पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त होऊ शकते. राष्टÑवादी काँग्रेसने बाळापूर व मूर्तिजापूर या दोन ठिकाणी निवडणूक लढविली. त्यापैकी बाळापुरात दारुण पराभव झाला, तर मूर्तिजापुरात तिसºया क्रमांकावर राहावे लागले. हे पाहता आता भविष्यात नव्याने पक्ष बांधणीची जबाबदारी पेलावी लागणार असून, नव्या नेतृत्वाला आतापासूनच ताकद देण्याची गरज आहे.