राजेश शेगाेकार, अकोला: जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक .२८ एप्रिल रोजी होणार असल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. बाजार समित्या ताब्यात ठेवण्यासाठी सहकार नेत्यांचा कस लागणार असून, यामध्ये यशस्वी कोणाला करायचे ? याचा फैसला मतदारांच्या हाती आहे.
सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी या सातही बाजार समित्यांचा कार्यकाळ संपल्याने सध्या तेथे प्रशासकराज आहे.
बाजार समिती निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य तसेच ग्रामपंचायतचे सदस्य मतदानाचा हक्क बजावतात. दरम्यान, मध्यंतरी १० गुंठ्यांपेक्षा अधिक शेती नावावर असणाऱ्या शेतकऱ्यालादेखील मतदानाचा हक्क बहाल करण्याच्या हालचाली वाढल्या होत्या; परंतु बदल लागू झाला नसल्याने पूर्वीचेच मतदार राहणार आहेत केवळ त्यांना उमेदवारी सादर करता येणार आहे.
जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांची मतदार यादी अंतिम झाल्याने २८ एप्रिल रोजी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय हालचाली वाढल्याने निवडणुका चुरशीच्या होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषत : अकोट, तेल्हारा व अकोला येथील बाजार समितीच्या निवडणुका अटीतटीच्या होण्याचा अंदाज सहकार क्षेत्रातून वर्तविला जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"