लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिवंत वीज वाहिन्यांचे खांब आणि त्यापुढे कृषी पंपांना पुरवठ्याचे रोहित्र असताना त्या खांबाभोवती तलाव खोदून रोहित्राचा पुरवठाच बंद करण्याचा प्रकार तालुक्यातील पळसोबढे येथे घडला आहे. येत्या सात दिवसात खांब आणि रोहित्र वाहिनीमध्ये आवश्यक दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत न केल्यास संपूर्ण गावाचा पुरवठा बंद केला जाईल, असा इशारा रोहित्रावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे. शासकीय योजनेतून १०० बाय १०० चौ. मीटर परिसरात खोदलेल्या तलावात विद्युत खांब आणि कृषी पंपाचे रोहित्र आल्याने त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचा पुरवठा महिनाभरापासून खंडित करण्यात आला आहे. शेतात वीजपुरवठा होणारे रोहित्र आणि त्याला पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीचे खांब दोन्ही तलावात बुडणार आहेत. तलाव खोदताना ते मध्यभागात आले आहेत. त्यामुळे त्या रोहित्राचा वीजपुरवठा गेल्या महिनाभरापासून बंद करण्यात आला. आता पेरणी लवकरच सुरू होणार आहे. पावसात खंड पडल्यास बोअरवेल्सचे पाणी देण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी शेतातील रोहित्रातून पंपापर्यंत वीजपुरवठा आवश्यक आहे. महिनाभरापासून तो बंद असल्याने आता सात दिवसात विजेच खांब आणि रोहित्राची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांना निवेदन सादर केले. त्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बोर्डे, विजय बोर्डे, अमित बोर्डे, गोपाल बोर्डे, श्याम बोर्डे, रमेश बोर्डे, अरुण बोर्डे यांच्या स्वाक्षरी आहेत.
वीज खांबांभोवती खोदला तलाव!
By admin | Published: June 07, 2017 1:21 AM