निपाणा-बोरगाव मंजू रस्त्यावरील घटना: महावितरणचा गलथान कारभार
बोरगाव मंजू: बोरगाव मंजू ते निपाणा मार्गावर विद्युत खांबावरून जिवंत वीज तार तुटून पडल्या. येथील शेतकरी अर्जून बावस्कर हे मंगळवार, दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी बैलबंडी घेऊन शेतात जात असताना वीज तारेला स्पर्श झाल्याने दोन्ही बैलांचा शॉक लागून घटनास्थळावर मृत्यू झाला. सुदैवाने या घटनेत शेतकरी बचावला असून, महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बोरगाव मंजू येथील शेतकरी अर्जुन बावस्कर शेतात निपाणा रस्त्याहून बैलबंडीसह जात होते. या मार्गावर विद्युत खांबावरील तार तुटून पडल्या होत्या. महावितरणचा गलथान कारभार हा शेतकऱ्यांचा मुळावर उठला आहे. बैलांचा या तारांना स्पर्श झाल्याने बैलजोडीचा मृत्यू झाला आहे. गत दहा वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल असताना बैलजोडी विद्युत शाॅक लागून मोठे नुकसान झाले आहे. हा प्रकार लक्षात येताच धुरकरी शेतकरी बावस्कर यांनी प्रसंग सावध होऊन जीव मुठीत धरून मरणाच्या दारातून बाहेर पडले. दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
--------------------------------
शेतकऱ्याची पोलिसात तक्रार
शेतकऱ्याच्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याने या घटनेची तक्रार शेतकरी बावस्कर यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान आर्थिक संकटात असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.