.-------------
पिंजर परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित
निहिदा : पिंजर परिसरातील निहिदा, शेलगाव आदी गावांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.
-----------
चोंडा नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करा
आगर : हातला, लोणाग्रा शेतशिवारातून वाहणाऱ्या चोंडा नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे. याबाबत शेतकऱ्यांनी लेखी मागणी करून चार महिने झाले असून, अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. याबद्दल शेतकऱ्यांनी राेष व्यक्त केला आहे.
-------------
अतिवृष्टी मदतीला विलंब
व्याळा : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मूग, उडीद पिकांचे सर्वेक्षण होऊन नऊ महिने उलटले तरी तत्कालीन तलाठ्यांनी केलेल्या घोळामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहावे लागले. पात्र लाभार्थ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
..........
जीएमसीत कर्मचारी घेत आहेत आरोग्याची विशेष काळजी
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात कोविडसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे, शिवाय कोविड चाचण्याही याच परिसरात होत असल्याने, येथील कर्मचारी स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देताना दिसून आले. सर्वच कर्मचारी मास्क आणि सॅनिटायझरचा प्रामुख्याने वापर करीत असले तरी त्यांना भेटायला येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक विनामास्कच असतात.
.................
डासांचा प्रादुर्भाव वाढला
अकोला : दोन दिवसापूर्वी शहरात झालेल्या पावसामुळे विविध परिसरातील सखल भागात पावसाच्या पाण्याने डबकी साचली आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या साथीसह वातावरण बदलामुळेही शहरात आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तत्काळ डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
............
रस्त्याच्या कडेलाच कचऱ्यांचा ढीग
अकोला : शहरातील केशवनगर, माधवनगर, खडकी, कौलखेड परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच कचरा पेटवून दिला जात असल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. याशिवाय सध्या वारा उधाणाचे दिवस असल्याने आगीसारख्या घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे कचरा पेटविणाऱ्यांवर वचक बसविण्याची गरज व्यक्त होत आहे.