दादाराव गायकवाड/ कारंजा (वाशिम): जिल्ह्यात वीज चोरीला आळा घालण्याकरिता महावितरणच्या वतीने एप्रिल गत नऊ महिन्यात १६ प्रकरणांमध्ये २ लाख ७१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी २ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गत काही वर्षांपासून वीज चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. वीज चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वीज वितरणकडून भरारी पथकही नियुक्त करण्यात आलेले असून, जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागात हे पथक वीज चोरी पकडून वीज चोरट्यांना तत्काळ दंड आकारण्याची कारवाई करीत आहे. याशिवाय वीज चोरी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हय़ात महावितरणने एप्रिल २0१५ ते आजपर्यंत १६ प्रकरणांमध्ये २ लाख ७१ हजार रुपयांच्या दंडाची आकारणी केली आहे. त्यापैकी १३ प्रकरणांत २ दोन लाख २ हजारांचा दंड वसूल केला आहे. सदर कारवाई ही केवळ जिल्ह्यांतर्गत कार्यरत उपविभागांकडून करण्यात आलेली असून, यामध्ये भरारी पथकाच्या कारवाईचा समावेश नाही. वाढत्या वीज चोरीमुळे दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रकार वारंवार घडत असून, त्याचा फटका मात्र नियमित वीज बिल भरणा करणार्या वीज ग्राहकांना भोगावा लागतो. विजेच्या खांबावरील तारांवर थेट आकोडे टाकून विजेचा वापर करण्यासोबतच विजेचे मीटर वेगळे करून थेट विजेचा वापर करणे, इतर एखाद्या वस्तूचा आधार घेऊन विजेच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करणे आदी प्रकारे वीज चोरी केली जाते. काही ठिकाणी तर घरगुती वापराच्या नावे घेतलेल्या वीज जोडणीवर व्यावसायिक कामे केली जातात. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी वीज वितरणकडून वेगवेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहेत; मात्र अनेक जण घरगुती कारणासाठी वीज घेऊन व्यावसायिकसाठी त्याचा वापर करतात. या वीज चोरांविरुद्ध महावितरणच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.
वीज चोरांकडून वर्षभरात २ लाखांचा दंड वसूल
By admin | Published: December 29, 2015 2:06 AM