बुलडाणा : जवळच असलेल्या देऊळघाट शिवारात अंगावर वीज कोसळून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ४ च्या सुमारास घडली. बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथील कपडा व्यवसायी शे.जियाउद्दीन यांचा १६ वर्षीय मुलगा शे.सुलतान हा देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात होता. दरम्यान, पहिला पेपर देऊन सुलतान घरी आल्यानंतर पैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या शेतात पाहणी करण्यासाठी गेला. यावेळी त्याच्यासोबत सहाव्या वर्गाचा विद्यार्थी शे.सोहिल शे.अय्युब होता. यावेळी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी अचानक वीज अंगावर कोसळल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले; मात्र सुलतान याचा मृत्यू झाला, तर सोहिलवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच आ. हर्षवर्धन सपकाळ, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके, तहसीलदार दीपक बाजड, गटविकास अधिकारी लोखंडे, सरपंच आरीफ खान, जुनैद खामन, गजनफर खान अ.रज्जाक आदींनी रूग्णालयात भेट दिली.
वीज कोसळून एक विद्यार्थी ठार, एक जखमी
By admin | Published: March 02, 2016 2:28 AM