लोकमत न्यूज नेटवर्कहातरुण : दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले हातरुण वीज उपकेंद्राचे काम पूर्णत्वास आले आहे. १0 गावांसाठी गावठाण आणि कृषी असे स्वतंत्र फिडरचे काम अंतिम टप्प्यात आहे. हातरुण वीज उपकेंद्रातील उपकरणाची टेस्टिंग सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उपकेंद्र कार्यान्वित होणार असल्याने परिसरातील दहा गावांतील विजेची समस्या मिटणार आहे. गायगाव वीज उपकेंद्रांतर्गत २९ गावांत विजेची समस्या वारंवार निर्माण होत असल्यामुळे हातरुण येथे वीज उपकेंद्र उभारण्याची मागणी बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यात आल्याने ही मागणी मंजूर करण्यात आली. निमकर्दा ते हातरुण मार्गावर हातरुण शिवारात उपकेंद्राचे काम पूर्णत्वास आले. हातरूण, मालवाडा, शिंगोली, बोरगाव वैराळे, सोनाळा, मांजरी, मोरझाडी, खंडाळासह परिसरातील गावांतील विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हातरुण येथे ३३ के.व्ही. उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. पारस रेल्वेलाइनच्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग वर तार जोडण्याचे काम रेल्वे विभागाची परवानगी नसल्याने दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र महावितरणचे बाळापूर उपविभागीय अभियंता काळे आणि गायगाव वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता देवेंद्र तांबे यांनी रेल्वे विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला होता.यासाठी पाठपुरावा करण्यात आल्याने थांबलेले काम मार्गी लागले आहे. या ठिकाणी अंडरग्राउंड वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. वीज उपकेंद्र लवकरच कार्यान्वित होणार असल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गायगाव वीज उपकेंद्रांतर्गत २९ गावांत वीज पुरवठा केला जातो; मात्र, वारंवार बिघाड होत असल्याने अनेक गावे २ ते ३ दिवस अंधारात राहतात. परिसरातील गावात विजेचा लपंडाव कायम असून, लो - होलटेजची समस्या अनेकवेळा निर्माण होते. हातरुण वीज उपकेंद्रासाठी शेळद येथून २२ किलोमीटर अंतराची ३३ केव्हीची वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. गावठाणचे दोन फिडर आणि कृषी पंपासाठी एक फिडर असे तीन फिडरचे काम पूर्णत्वास आले आहे. हातरुण वीज उपकेंद्रातील उपकरणांची सध्या टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वीज उपकेंद्र सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.
कमी दाबापासुन सूटका!वीज पुरवठय़ात बिघाड झाल्यास गायगाव आणि शेळद येथून पुरवठा घेऊन वीज पुरवठा सुरळीत सुरू राहील. १0 गावांतील लो - होल्टेजची समस्या संपणार आहे. जिथे बिघाड आहे, त्याच भागाचा पुरवठा खंडित राहील आणि उर्वरित भागात वीज पुरवठा सुरू राहणार असल्याचे कनिष्ठ अभियंता तांबे यांनी सांगितले.
रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी वीज जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या उपकेंद्रातील उपकरणे चार्ज करून टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण होऊन पॉझिटिव्ह निर्णय आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार उपकेंद्र कार्यान्वित करण्यात येईल.- देवेंद्र तांबे, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, गायगाव
मुख्यमंत्र्यांनी हातरुण वीज उपकेंद्राची मागणी मंजूर केली. उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून, १0 गावांतील विजेची समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी हातरुण वीज उपकेंद्र तत्काळ कार्यान्वित करणे गरजेचे आहे.- नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर