अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे. धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने महावितरणच्या कामकाजावर अकोलेकरांसह मनपा प्रशासनाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात मनपाकडून महावितरण कंपनीला पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती आहे.यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे महान धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. साहजिकच, सिंचनासाठी विजेचा वापर वाढला असून, त्याचा परिणाम महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर होत असल्याचे समोर आले आहे. सिंचनासाठी विजेचा वापर वाढल्यामुळे जलशुद्धीक रण केंद्रावरील विद्युत दाब कमी होत आहे. यामुळे पाण्याचा उपसा करणारे पंप वेळोवेळी बंद करण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर एक्स्प्रेस फिडर असतानाही वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे मागील काही दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद करावा लागत आहे. धरणात जलसाठा उपलब्ध असतानाही ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे अकोलेकरांमध्ये महावितरण कंपनीप्रती तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. या प्रकाराची दखल घेत मनपा प्रशासनाकडून महावितरण पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती आहे.दाब कमी; उपशावर परिणामजलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी आणि २५ एमएलडीचे दोन प्लान्ट कार्यान्वित आहेत. ६५ एमएलडीच्या प्लान्टवर पाण्याचा उपसा करण्यासाठी पाच पंप असून, त्यापैकी तीन पंपांद्वारे उपसा केला जातो. २५ एमएलडीच्या प्लान्टवर दोन पंप असून, त्यापैकी एका पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. सकाळी ८ ते सायंकाळी ४ हा कालावधी पाण्याच्या उपशाकरिता महत्त्वाचा आहे. नेमका याच कालावधीत जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत दाब कमी होत असल्याने मनपाला नाइलाजाने एका पंपाद्वारे पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे.