अकोला : ग्राहकांकडील थकबाकीचा वाढता डोंगर व महागड्या दराने वीज खरेदी करून तीचे वितरण करण्यात जमाखर्चाचा हिशेब कोलमडलेल्या महावितरने आता इंधन समायोजन शुल्काच्या (एफएसी) नावाखाली किंचित वीज दरवाढ केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाची परवानगी घेत महावितरणने गत दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा सर्वच प्रकारातील वीज ग्राहकांकडून ५ ते २५ पैसे प्रती युनिट इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.
महावितरण स्वत: वीज निर्मिती करत नाही. इतर कंपन्यांकडून वीज घेऊन ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. अनेकदा महागड्या दराने वीज घ्यावी लागते. यावर तोडगा म्हणून महावितरण ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्क वसूल करत असते. वर्ष २०२० पर्यंत नियमितपणे ग्राहकांच्या दरमहा वीज बिलातून हे शुल्क आकारले जात होते. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने ३० मार्च २०२० ला हे शुल्क शून्य केले होते. यावर्षी उन्हाळ्यात अभूतपूर्व कोळसा टंचाई निर्माण होऊन महावितरणवर भारनियमनाची नामुष्की ओढावली होती. महावितरणने आर्थिक स्थिती चांगली नसतानाही मोठा खर्च करून भारनियमन टाळण्यात यश मिळविले होते. वीज खरेदीवर झालेल्या अतिरिक्त खर्चाची भरपाई करता यावी यासाठी महावितरणने इंधन समायोजन शुल्क वसूल करण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे मागितली होती. आयोगाने तीन महिने हे शुल्क वसूल करण्यास हिरवी झेंडी दिल्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलातून ५ ते २५ पैसे प्रती युनिट वसुली सुरू झाली आहे.
अशी आहे इंधन समायोजन शुल्काची आकारणी
युनिट - समायोजन शुल्क (पैशांमध्ये)
०.३० (बीपीएल) - ०.०५
१-१०० - ०.१०
१०१-३००- ०.२०
३००-५०० - ०.२५
५०० पेक्षा अधिक ०.२५