अकोट : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चक्क आकोडे टाकून केलेली वीज चोरी महावितरणने पकडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात महावितरणने नियमाप्रमाणे दंडासह ६१ हजारांचे देयक बजावण्यात आले आहे.
येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोपटखेड मार्गावर असलेल्या ग्रामीण रुग्णालय परिसरातील कर्मचारी वसाहतीमध्ये धाड टाकली. यावेळी वसाहतीमधील दोन निवासस्थानी आकोडे टाकून वीज चोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले. शासकीय कर्मचारी असल्याने बिनधास्तपणे कारवाई होण्याची भीती न ठेवता चोरीने वीजपुरवठा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत सर्व्हिस वायर जप्त केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयच्या वैद्यकीय अधीक्षकांना वीज चोरी देयकासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही निवासस्थानी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ६१ हजारांचे वीज चोरीचे देयक बजावण्यात आले. ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल, सहाय्यक अभियंता अरुण जाधव, अजय वसू ,तंत्रज्ञ दीपिका शेवाळे, तंत्रज्ञ रुपेश तायडे यांनी केली.
----------------------
वीजचोरी अन् वाढती थकबाकी
अकोट शहर व तालुक्यात वीज देयकाच्या थकबाकीचा आकडा लाखोंच्या घरात आहे, तर दुसरीकडे वीज चोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. वीज कर्मचाऱ्यांसोबतच कार्यालय सोडून स्वतः उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता थकबाकी वसुलीसाठी फिरत आहेत. वीज कपात करण्यावरून खटके उडत आहेत. पंरतु चक्क शासकीय निवासस्थानी वीज चोरी उघडकीस आल्यानंतर वीज चोरीला आळा घालण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.
------------
वीज चोरी प्रकरणी कारवाई सुरू आहे. संबंधितांना बजावण्यात आलेले देयकांचा भरणा न केल्यास नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
- गोपाल अग्रवाल, उपकार्यकारी अभियंता, अकोट.