लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी यंदापासून प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जाणार आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. अग्निपंख बहूद्देशीय संस्थेच्यावतीने प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. पाटील बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती, मनपा आयुक्त अजय लहाने, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, माजी महापौर उज्ज्वला देशमुख, अँड. मोतीसिंग मोहता व डॉ.गजानन नारे, डॉ. अशोक ओळंबे, अविनाश बोर्डे, प्रकाश डवले, मनीष गावंडे, नरेंद्र गुल्हाने यांच्यासह शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री म्हणाले, की इयत्ता अकरावीच्या प्रवेश पद्धतीत पारदर्शकता येण्यासाठी तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये आणि प्रत्येक महाविद्यालयात जाण्याचा त्रास वाचावा, म्हणून प्रवेश प्रक्रिया सहज आणि सुलभ होण्यासाठी सन २0१७-२0१८ या कालावधीचे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश आता केंद्रीय ऑफलाइन पद्धतीने केले जातील. या पद्धतीसाठी शिक्षण मंत्री व शिक्षण खात्याच्या अधिकार्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. सामाजिक दायित्व म्हणून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जाईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संघ, विजुक्टा, विमाशि संघटना, शिक्षक आघाडी, मेस्टा संघटना, म. रा. शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक सेना, खासगी प्रा. शिक्षक संघटना, विनाअनुदानित कृती समिती यांचे सहकार्य लाभले.
अकरावी प्रवेश ऑफलाइन पद्धतीनेच!
By admin | Published: June 20, 2017 4:52 AM