अकोला : इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अर्ज स्वीकारण्यासाठी देण्यात आलेली तीन दिवसांची मुदतवाढ गुरुवारी संपली असून, अंतिम प्रवेश याद्या सोमवार, १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अकोल्यातील जिल्हा परिषद आगरकर विद्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार व विद्यार्थ्यांच्या हितासाठी इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला तीन दिवसांची देण्यात आलेली मुदतवाढ २७ जून रोजी संपली आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याच्या मुदतवाढीमुळे अंतिम प्रवेश यादी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले असून, आता अंतिम प्रवेश याद्या १ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांना मराठा व सवर्ण आरक्षणाची सवलत घ्यायची आहे, त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह तसेच अकरावी प्रक्रिया अर्जाच्या पावतीसह केंद्रीय प्रवेश समिती सचिवांकडे २९ जून रोजी दुपारी ४ वाजतापर्यंत अर्ज करण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले आहे. ८ जुलैपासून दुसऱ्या प्रवेश फेरीला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.