अकोला : इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला १७ जूनपासून सुरुवात झाली; परंतु विद्यार्थ्यांकडून नांदेड पॅटर्नला पसंती दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत केवळ ३ हजार २०० विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यंदा अकरावी विज्ञान शाखेच्या ५० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येते.महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ५५ कनिष्ठ महाविद्यालयांत इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण ८ हजार ३६० जागा उपलब्ध असून, त्यासाठी १७ जूनपासून प्रवेश अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. २० जूनपर्यंत सुरू केवळ तीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. मुदत संपल्याने शुक्रवार, २१ जूून ते सोमवार, २४ जून या कालावधीत विलंब शुल्कासोबत प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येणार आहे; मात्र शुक्रवारी केवळ २०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. आतापर्यंत शिक्षण विभागाकडे प्राप्त अर्जांचा विचार केल्यास यंदा अकरावी विज्ञान शाखेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा नांदेड जिल्ह्याकडे असल्याने ही परिस्थिती उद््भवल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.म्हणून नांदेड ‘पॅटर्न’ला पसंतीयंदा नीट, सीईटी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी लागल्याने विद्यार्थ्यांनी स्थानिक कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठ फिरविल्याचे बोलल्या जात आहे. तसेच शेजारील जिल्ह्यातील विद्यार्थीदेखील अकोल्यापेक्षा नांदेडला पसंती देत आहेत.अनेक तुकड्या प्रवेशाविनाच राहणार!५० टक्क्यांपेक्षा कमी जागांवर प्रवेश होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयांना समान प्रवेश देणे शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत लहान कनिष्ठ महाविद्यालयांना योग्य न्याय न मिळाल्यास त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. गतवर्षीदेखील काही प्रमाणात लहान कनिष्ठ महाविद्यालयांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.गतवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादरीकरणासाठी २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.- गजानन चौधरी, इयत्ता अकरावी, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती सदस्य, अकोला.