लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : सेठ बन्सीधर हायस्कूलमधील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक यंत्रांची माहिती व्हावी, ते यंत्र बनवता यावे, विविध क्षेत्रातील नवीन यंत्राचा शोध लावून विद्यार्थ्यांमध्ये याविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठीच्या केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या निकषांमध्ये अटल लॅबकरिता ही शाळा पात्र ठरली असून, जिल्ह्यातील ही एकमेव शाळा यासाठी पात्र ठरल्याची माहिती आहे.
शहरातील सेठ बन्सीधर हायस्कूलमध्ये अध्यक्ष बेनीप्रसाद झुणझुणवाला यांनी संचालक मंडळाच्या सहकार्याने शाळेचा कायापालट केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत शाळेचा विकास व सुविधांकडे लक्ष दिले. त्यामुळे केंद सरकारच्या निती आयोगाच्या निकषांमध्ये अटल टिंकरिंग लॅबकरिता ही शाळा जिल्ह्यातून प्रथम पात्र ठरली आहे. त्यानंतर इतर शाळा पात्र ठरल्या असून, शाळेला लॅबमधील साहित्य खरेदीकरिता १२ लाख रुपये मिळाले. शाळेने जवळपास २० लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले असून, या लॅबमध्ये सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे ड्रोन, एरोस्पेस, थ्रीडी प्रिंटर, मेकॅनिकल, सेन्सर, लॅपटॉप व प्रोजेक्टरचा वापर करून वेगवेगळ्या स्लाईड तयार करणे, प्रोजेक्ट तयार करणे यासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष बेनीप्रसाद झुणझुणवाला, उपाध्यक्ष विलास जोशी, व्यवस्थापक गोपाल मल्ल, कोषाध्यक्ष विठ्ठलराव खारोडे व संचालक मंडळ, प्राचार्य राजेंद्र देशमुख व लॅब प्रमुख मोहन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या लॅबमध्ये शिक्षण घेत आहेत.