अकोला: स्थानिक अकोला क्रिकेट क्लब लगत फोफावलेल्या अतिक्रमणाचा सोमवारी महापालिका प्रशासनाने सफाया केला. जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. ‘एसीसी’लगतच्या एका जागेवरील पेट्रोल पंपाची लिज संपुष्टात आल्याने सदर कारवाई भूमी अभिलेख विभाग व मनपाच्या यंत्रणेने संयुक्तरीत्या पार पाडली.स्थानिक ‘एसीसी’ मैदानाच्या बाजूला असलेल्या एका पेट्रोल पंपाला भूमिअभिलेख विभागाने भाडेपट्ट्यावर जागा दिली होती. पेट्रोल पंपाच्या जागेतील काही भागात मोटर वाहन दुरुस्तीची दुकाने व भंगार व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. अतिक्रमकांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील व्यावसायिक व रहिवासी कमालीचे वैतागले होते. या प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पेट्रोल पंपालगतचे सर्व अतिक्रमण धाराशाही करण्याचा आदेश तहसीलदार विजय लोखंडे तसेच मनपा प्रशासनाला दिला. मनपाच्या सहायक आयुक्त पूनम कळंबे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांच्यासह अतिक्रमण पथकातील कर्मचाºयांनी सोमवारी सायंकाळपर्यंत शासनाच्या जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची कारवाई केली.