अकोला : विदर्भात अतिशय हुशार विद्यार्थी असून, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते युपीएससीमध्ये यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात विदर्भात खासकरून वाशिम, अकोला जिल्ह्यात यूपीएससीसाठी विद्यार्थी घडविण्यावर भर राहणार असून, त्यासाठी विविध सेमिनार घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आवश्यक पुस्तकांचा पुरवठा करणार असल्याचे मत एनसीबीचे माजी विभागीय संचालक व सध्या केंद्रीय करदाते सेवा संचालनालय चेन्नई येथे अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत समीर वानखेडे यांनी व्यक्त केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्टुडंट फोरम तर्फे शनिवार, दि.२१ ऑक्टोबर रोजी आयोजित यूपीएससी परीक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भातील विद्यार्थ्यांचा एमपीएससीकडे जास्त कल दिसतो, मात्र यूपीएससी ची तयारी काही वेगळी नसून दोन्हीही परीक्षेची प्रक्रिया सारखीच आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते यशस्वि होऊ शकतात, असा आशावादही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. याप्रसंगी स्टुडंट फोरमचे अध्यक्ष डॉ. शिरीष तराळे, विकास पवार, रोहित पाटील, आचल राजपूत आदी उपस्थित होते.
अशोक वाटीकेत केले अभिवादन!आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी सकाळी शहरातील अशोक वाटिका येथे तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बुद्धवंदना घेतली. राजकारण नव्हे, तर अकोला माझे घर मी येत राहणार!गेल्या काही दिवसांपासून समिर वानखडे यांचे अकोला, वाशिम जिल्ह्यात दौरे वाढल्याचे पहावयास मिळत आहे. यासंदर्भात राजकारणात सक्रीय होणार का, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर वानखडे यांनी अकोला माझे घर असून, कौलखेड परिसरात माझे बालपण गेले आहे. आता अठरा वर्षे सर्व्हिस झाली असून, समाजाचं काही देणं आहे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे अकोल्यात येत राहणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.