अकोला : रोजंदारी मजुरांना योग्य मजुरी देण्यात यावी, ट्रॅक्टरचालक व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी २५ जूनपासून धरणे आंदोलन करणार्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्यांनी मागण्या पूर्ण न केल्यास या हंगामात पेरणीसह कोणतीच कामे करणार नसल्याचा इशारा कृषी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे. कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती संशोधन केंद्र, वणीरंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्रासह सर्वच ब्लॉकवरील कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गत सात दिवसांपासून कृषी विद्यापीठाची प्रक्षेत्रावरील कामे ठप्प आहेत. ट्रॅक्टर, वाहनचालकांना ५00 रुपये, रोजंदारी मजुरांना नवीन रोजंदारी वेतनाप्रममाणे ३५0 रुपये देण्यात यावेत, जेव्हापासून नवीन मजुरी सुरू झाली तेव्हापासूनची थकबाकी देण्यात यावी, आठवड्याच्या आठवड्याला मजुरांना पगार देण्यात यावे, ३0 वर्ष काम करणार्या मजुरांना सेवेत कायम करावे, वाहनचालकांची भरती करताना ती केवळ कृषी विद्यापीठांतर्गतच करावी, नवीन प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यात यावे, स्वइच्छेने काम सोडणार्या कर्मचार्यांना उपदानाची रक्कम लवकर देण्यात यावी, आदी मागण्यासाठी या कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण न केल्यास या हंगामात कोणतीच कामे करणार नसल्याचा इशारा या कर्मचार्यांनी दिला असला तरी, कृषी विद्यापीठ प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला असता तूर्तास या विषयावर त्यांनी बोलण्याचे टाळले. (प्रतिनिधी)
कृषी विद्यापीठ कर्मचार्यांचा संप सुरू
By admin | Published: July 02, 2014 12:28 AM