अकोटः बाजार समितीत अपहार व फसवणूक प्रकरणातील आरोपी बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांच्यावर अन्याय झाल्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांनी बाजार समितीत दि. २१ जून रोजी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनाची कुठलीही सूचना न देता बाजार समितीचे काम ठप्प झाले होते. त्यामुळे धान्य विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. प्रहार सेवक व शेतकऱ्यांनी मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडले. दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी अकोट गाठून बाजार पूर्ववत सुरू केल्याने तणाव निवळला. शहर पोलिसांनी नियमबाह्य काम बंद आंदोलन करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, तर सहसचिव विनोद कराळे यांना निलंबित केले आहे, तसेच १५ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अकोट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी समितीमधील १६ लाख १९ हजार ७८५ रुपयांचा अपहार प्रकरणातील आरोपी सचिव राजकुमार माळवे यांच्यावर अन्याय झाल्याचा कांगावा करीत सहसचिव विनोद कराळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी दि. २१ जून रोजी बाजार समितीत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. बाजार समिती कार्यालयाला कुलूप लावून पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले. निवेदनात माळवे यांना त्रास देत त्यांची फसवणूक केली. अफरातफरीला लेखापाल मंगेश बोंद्रे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे बाजार समितीचे आर्थिक व्यवहार व व्यापार बंदमुळे होणारे नुकसानीसाठी फिर्यादीमधील माजी संचालक जबाबदार राहणार असल्याचे नमूद केले. दरम्यान, बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला व्यापारी बांधवांनी समर्थन दिले नसल्याचे लेखी स्पष्ट केले. व्यापारी हे शेतकरी बांधवांचे सेवेसाठी असून, व्यापार सुरु ठेवण्यासाठी इच्छुक आहेत. बाजार समितीत आवश्यक सर्व सुविधा देण्याची मागणी मुख्य प्रशासकांकडे व्यापाऱ्यांनी केली आहे.
अकोट येथे कर्मचाऱ्यांनी बाजार समितीचे काम बंद ठेवल्याची माहिती मिळताच अकोला जिल्हा उपनिबंधक व्ही.डी. कहाळेकर व मुख्य प्रशासक सहनिबंधक आर. टी. पालेकर हे अकोट बाजार समितीत दाखल झाले. त्यावेळी बाजार समितीला कुलूप असल्याचे आढळले. कुलपाची चावी सहसचिव सोबत घेऊन गेल्याचे कळताच जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे निखिल गावंडे, कुलदीप वसू यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी कुलूप तोडून बाजार समितीचे मुख्य कार्यालय उघडले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक व्ही.डी. कहाळेकर व मुख्य प्रशासक सहनिबंधक आर. टी. पालेकर यांनी व्यापारी, शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. बाजारातील खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्याचा आदेश दिला. त्यामुळे बाजार सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
.........
आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल
बाजार समितीचे काम बंद आंदोलन करुन पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर करण्यासाठी गेलेले सहसचिव विनोद कराळे यांच्यासह १६ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन सर्वांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाचपोर करीत आहे.
---------------------------
सहसचिव निलंबितः १५ कर्मचाऱ्यांना ‘शो काॅज’
बेकायदेशीर बाजार समिती काम बंद करुन कुलूप लावले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी सचिव पदाचे प्रभारी सहसचिव विनोद कराळे यांना सेवेतून निलंबित केले. तसेच १५ कर्मचाऱ्यांना ‘शो काॅज’ नोटीस बजावण्यात आली. अकोट बाजार समितीचा प्रभार तेल्हारा बाजार समिती सचिव सुरेश सोनोने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.