अकोला, दि. ४- महापालिका कर्मचार्यांचे पाच महिन्यांचे वेतन थकीत आहे. कर्मचार्यांसाठी दिलासा का होईना, एक महिन्याच्या वेतनाची सोय झाली असून, शासनाकडून एलबीटीच्या बदल्यात ३ कोटी ९३ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. उर्वरित रकमेचा जुगाड करून कर्मचार्यांना एक महिन्याचे वेतन अदा केले जाईल. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत मनपा कर्मचार्यांचे चार महिन्यांचे वेतन रखडले होते. वेतन अदा होईल एवढी रक्कम तिजोरीत नसल्यामुळे विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त कोट्यवधींच्या रकमेच्या बदल्यात बँकांमध्ये व्याजापोटी जमा ९ कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने शासनाकडे लावून धरली होती. ऑक्टोबर २0१६ मध्ये परतफेडीच्या अटी-शर्ती ठेवून शासनाने ९ कोटी २६ लाखांची रक्कम मंजूर केली होती. त्यावेळी प्रशासनाने कर्मचार्यांचे थकीत वेतन अदा केल्यानंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी असे पाच महिन्यांचे वेतन पुन्हा रखडले. मे महिन्यानंतर मनपाच्या सुधारित मालमत्ता कर वसुलीला सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. त्यानंतर किमान दोन-तीन महिन्यांत वेतनाची समस्या निकाली निघेल, असा प्रशासनाला विश्वास आहे. असे असले, तरी मागील पाच महिन्यांचे वेतन रखडल्यामुळे कर्मचारी वैतागले आहेत. यावर तात्पुरता दिलासा का होईना, शासनामार्फत एलबीटीच्या बदल्यात ३ कोटी ९३ लाख रुपये अनुदान मनपाला प्राप्त झाले आहे. मनपाकडे असलेली उर्वरित रक्कम जमा करून कर्मचार्यांना एक महिन्याचे वेतन अदा केले जाणार आहे.
मनपा कर्मचा-यांच्या वेतनाची सोय झाली!
By admin | Published: March 05, 2017 1:44 AM