पातूर : तालुक्यातील सुकळी येथील रोजगार सेवकाचा डेंग्यू आजारामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.
पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सुकळी, चान्नी, चतारी, खेट्री, राहेर, सावरगाव, शिरपूर, चांगेफळ आदी गावात स्वच्छतेचा अभाव व दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. सुकळी येथील रोजगार सेवक संदीप त्र्यंबक अंभोरे यांना ताप आल्याने उपचारार्थ अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता सुकळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुनील फाटकर, दीपक धाडसे, भंडारज बु.चे सरपंच राजेंद्र इंगळे, दीपक इंगळे, काशीराम हिवराळे आदी उपस्थित होते. आरोग्य विभागाने दखल घेऊन परिसरात घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)