अकोला : महापालिका प्रशासनाचे अतिक्रमण निर्मूलन पथक हे जैन मंदिर परिसरातील मार्गावर अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवित असताना जुना भाजी बाजार येथील आणि मंदिरासमोरील काही अतिक्रमकांनी थेट अतिक्रमण निर्मूलन पथकावर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेची तक्रार मनपाच्या जेसीबी चालकाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी दिली.गांधी मार्ग, तिळक मार्ग, खुले नाट्यगृह ओपन थिएटर मार्ग, जैन मंदिर मार्ग व महापालिका ते सिटी कोतवालीच्या दोन्ही मार्गांवर अतिक्रमकांनी ठाण मांडले आहे. त्यानुसार नियमित अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई मोहीम हाती घेऊन सदर रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. जैन मंदिर परिसर आणि जुना भाजी बाजार येथील रस्त्यांच्या दोन्हीकडील अतिक्रमण हटविण्यात येत असताना यावेळी अतिक्रमक व अतिक्रमण निर्मूलन पथकामधील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यावेळी काही अतिक्रमकांनी थेट जेसीबी चालक करण खरारे यांच्यावर हल्ला चढविला; पण सुदैवाने तो थोडक्यात बचावले. त्यानंतर वाद वाढत गेल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख नरेंद्र घनबहादूर यांनी सदर घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे.