अकोला: जुने शहरातील गुलजारपुरास्थित हिंदू दफनभूमित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना स्थानिक अतिक्रमकांनी आडकाठी निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ध्यानात घेता गुरुवारी शिवसेना शहर प्रमुख (पश्चिम) तथा मनपाचे गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह सेनेच्या सर्व नगरसेवकांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन येत्या आठ दिवसांत हिंदू समाजातील लोकांसाठी दफनविधीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.हिंदू समाजातील रूढी,परंपरेनुसार काही पंथांमध्ये मृतदेहाला अग्नी न देता त्यांच्यावर दफनभूमित अंत्यसंस्कार केले जातात. त्यानुषंगाने जुने शहरवासीयांसाठी गुलजारपुरा भागात हिंदू स्मशानभूमि आणि हिंदू दफनभूमिची जागा उपलब्ध आहे. दफनभूमिसाठी सुमारे १३ एकर पेक्षा जास्त जागा उपलब्ध होती. मागील वीस ते बावीस वर्षांच्या कालावधीत दफनभूमिच्या जागेवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून, त्याठिकाणी पक्की घरे उभारली आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणाच्या समस्येकडे स्थानिक नगरसेवकांसह मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमकांनी दफनभूमिची संपूर्ण जागाच गिळंकृत केल्याचे चित्र पहावयास मिळते. कधीकाळी १३ एकर पेक्षा जास्त असलेली जागा आज रोजी अवघ्या पाच ते सहा हजार चौरस फुटांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या जागेमध्ये ठिकठिकाणी अवघ्या दीड ते दोन फुटाच्या अंतरावर मृतदेह गाडल्या जात आहेत. याठिकाणी जागा शिल्लक नसतानाच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाºया नागरिकांना स्थानिक अतिक्रमकांकडून आडकाठी निर्माण केल्या जात असल्याचा प्रकार समोर येताच, शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.आवारभिंतीची केली तोडफोडदफनभूमिच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात घेऊन मनपाचे तत्कालीन आयुक्तांनी आवारभिंतीचे निर्माण केले होते. स्थानिक अतिक्रमकांनी या भिंतीची तोडफोड करून जागेवर कच्ची घरे उभारल्याचे दिसून येते.जागेचा अहवाल सादर करा!शिवसेनेच्या निवेदनाची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तातडीने अतिक्रमण विभागातील कर्मचारी राजेंद्र टापरे यांना गुलजारपुरा येथील हिंदू दफनभूमिच्या जागेसंदर्भात अहवाल सादर करण्याचा आदेश जारी केला आहे.
आठ दिवसांत जागा द्या!जुने शहरातील गुलजारपुरा आणि नदीकाठावरील मोहता मिल परिसरात दफनविधीसाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे ऐन शेवटच्या क्षणीही मृतदेहाची अवहेलना होत आहे. मनपा प्रशासनाने दखल घेऊन पुढील आठ दिवसांत गुलजारपुरा आणि मोहता मिल परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेविका मंजुशा शेळके, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशी चोपडे, नगरसेविका अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सपना नवले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.दफनभूमिच्या जागेची इत्थंभूत माहिती, क्षेत्रफळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील वर्दळीची ठिकाणे, बाजारातील अतिक्रमण हटविल्यामुळे रस्ते प्रशस्त झाले आहेत. त्याप्रमाणेच गुलजारपुरा येथेही कारवाई केली जाईल. अतिक्रमकांनी स्वत:हून जागा मोकळी करून दिल्यास त्यांचे नुकसान होणार नाही.-संजय कापडणीस आयुक्त मनपा.