आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील मुख्य रस्ते असो वा गल्लीबोळात अतिक्रमणाचा सुळसुळाट झाला आहे. मुख्य बाजारपेठमध्ये खरेदीसाठी जाणार्या नागरिकांना रस्त्यावरून साधे पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. पार्किंगच्या जागांवर अतिक्रमकांनी कब्जा केल्यामुळे अकोलेकरांची दुहेरी कोंडी होत आहे. मनपातील अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या निष्क्रिय व ढिसाळ कारभारामुळे अतिक्रमकांचे मनोधैर्य उंचावले असून, अतिक्रमणाचा गुंता नेमका कधी सुटेल, असा प्रश्न वैतागलेले अकोलेकर उपस्थित करीत आहेत. शहरातील बाजारपेठ व प्रमुख रस्ते अतिक्रमकांनी ताब्यात घेतले आहेत. दिवस उजाडताच लघू व्यावसायिक, फेरीवाले, रेडीमेड ड्रेस विक्रेता, पाणीपुरी विक्रेत्यांसह फळ विक्रेता मुख्य रस्त्यांच्या बाजूला नव्हे, तर चक्क रस्त्यांवरच त्यांची दुकाने थाटतात. खासगी हॉस्पिटल, व्यावसायिक प्रतिष्ठाने, कर्मशियल कॉम्प्लेक्समधील दुकानांना अतिक्रमकांनी अक्षरश: वेढा घातला आहे. खासगी रुग्णालयात जाण्यासाठी अतिक्रमकांच्या गर्दीतून वाट काढताना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची दमछाक होते. मुख्य बाजारपेठमध्ये लाखो रुपये किमतीची दुकाने विकत घेऊन व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना अतिक्रमणामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पार्किंगच्या जागांवरही फेरीवाले, फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे दुकानात साहित्य खरेदीसाठी जाणार्या ग्राहकांसमोर दुहेरी संकट निर्माण होत आहे. रस्त्यावर वाहन उभे केल्यास टोइंग पथकाकडून कारवाई होते, तर वाहन उभे करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नाइलाजाने दुकानांसमोर वाहने उभी करावी लागतात. एकूणच, सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणारे अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असली, तरी ठोस व दैनंदिन कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमकांचे मनोबल उंचावले आहे. मनपाच्या धरसोड प्रवृत्तीमुळे अतिक्रमकांमध्ये धाक, दरारा निर्माण होत नसल्यामुळे कारवाईदरम्यान महापालिकेच्या कर्मचार्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहेत. अतिक्रमणाच्या समस्येला वेळीच आळा न घातल्यास भविष्यात शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अतिक्रमण विभाग करतो काय?शहरातील मुख्य रस्तेच नव्हे तर गल्लीबोळात निर्माण होणारे अतिक्रमण दूर करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची आहे. शहरात अतिक्रमणाची बजबजपुरी माजली असताना अतिक्रमण विभाग कोणते कर्तव्य बजावत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी हा विभाग पुढाकार घेत नसल्यामुळे नक्कीच संबंधित विभागाचे हात ओले होत असल्याच्या संशयाला बळ मिळत आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त अजय लहाने यांनी लक्ष देण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.
पार्किंगच्या जागा घशात! शहरात विविध ठिकाणी मनपाच्या मालकीच्या जागा आहेत. या जागांपासून उत्पन्न मिळण्यासोबतच वाहनधारकांची सोय व्हावी, या उद्देशातून प्रशासनाने सदर जागा पार्किंगसाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे मनपाची आवारभिंत, गांधी चौकातील दुर्गा देवी मंदिरसमोरील जागा, खुले नाट्यगृह ते भाटे क्लब मैदान, गांधी जवाहर बाग ते थेट जनता भाजी बाजार, जनता भाजी बाजार चौक, स्वराज्य भवनची आवारभिंत, टिळक रोडवर पिंपळेश्वर मंदिराच्या बाजूला, कन्हैया ड्रेस वेअरच्या बाजूला, जिल्हा परिषदेची आवारभिंत, सिटी कोतवाली मागील मनपा हिंदी शाळा क्र.३ चा परिसर आदींसह विविध ठिकाणचा समावेश आहे. संबंधित कंत्राटदारांनी फेरीवाले, फळ विक्रेता, रेडीमेड ड्रेस विक्रेत्यांसह खाद्यपदार्थांची विक्री करणार्या व्यावसायिकांना सदर जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे अक ोलेकरांना वाहन उभे करण्यासाठी जागाच उपलब्ध नाहीत. परिणामी, रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडत आहे. संबंधित जागेचे करार रद्द करून नव्याने निविदा काढण्यासाठी प्रशासन पुढाकार घेईल का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.
झोननिहाय पथके गुंडाळली!अतिक्रमणाच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी झोननिहाय कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अतिक्रमण विभागातील कर्मचार्यांच्या झोननिहाय नियुक्त्या करण्यात आल्या. हा प्रयोग गुंडाळण्यात आला असून, पुन्हा एकदा सर्व कर्मचार्यांना अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
हातगाड्यांवर होते कोट्यवधींची उलाढालअकोल्यातील होलसेल फ्रुट बाजारात कोट्यवधीची उलाढाल होते. नागपूर, अमरावतीचा संत्रा, दिल्ली, चंदीगड, हिमाचल प्रदेश, काश्मीरचे सफरचंद, परभणी, कंधार, नांदेडचे सीताफळ, आंध्र आणि तेलंगणाचे आंबे, नाशिकपासून पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षे, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी, केरळ-विशाखापट्टम येथील ओला नारळ अकोल्यात दररोज येतो. ही फळे विकण्यासाठी चक्क रस्त्यांवर हातगाडी उभी केली जाते.
सकाळी हटवले दुपारी थाटले!महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी सकाळी मनपाच्या आवारभिंतीलगतच्या रेडीमेड ड्रेस व्यावसायिकांसह गांधी चौकातील अतिक्रमकांना हुसकावून लावले. कहर म्हणजे सर्व अतिक्रमकांनी त्यांच्या हातगाड्या एका रांगेत गांधी चौक ते पंचायत समिती मार्गावर उभ्या केल्या होत्या. दुपारी मनपाचा जेसीबी हटताच सर्व अतिक्रमकांनी पुन्हा त्यांचा बाजार मांडला. एकूणच चित्र लक्षात घेता अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.-