अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान पोलिस सुरक्षा पुरविण्यास पुन्हा एकदा पोलिस प्रशासन कुचकामी ठरले. सुरक्षा व्यवस्थेची मागणी करण्यासाठी गेलेल्या मनपा अधिकार्यांना सोमवारी दिवसभर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात ताटकळत ठेवण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्ली बोळातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणेदेखील कठिण झाले. अतिक्रमणाच्या विळख्यातून शहराची सुटका करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी २६ जूनपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली. यादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस सुरक्षेची गरज लक्षात घेता, पोलिस प्रशासनासोबत तसा पत्रव्यवहार केला. त्यानुसार पोलिस सुरक्षा पुरविण्यात आली. पंढरपूर यात्रेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त व जिल्ह्यात चोरट्यांना लगाम घालण्यासाठी गस्तीसाठी पोलिस तैनात केल्याची सबब पुढे करीत पोलिस सुरक्षा पुरविण्यास नकार देण्यात आला. त्यावर मनपाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम बंद न ठेवता, कारवाई सुरूच ठेवली. यादरम्यान, ११ ऑगस्टपासून अतिक्रमण निर्मूलन धडक मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला. याकरिता पोलिस सुरक्षा पुरविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासोबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. या मुद्यावर आजपर्यंतही पोलिस प्रशासनाने ठोस निर्णय न घेतला नाही. अखेरीस ११ ऑगस्ट रोजी अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे यांनी पोलिस सुरक्षेच्या मागणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. त्यांनी सादर केलेल्या अर्जावर पोलिस प्रशासनाने सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय दिला नाही.
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला पोलिस सुरक्षा नाही!
By admin | Published: August 12, 2014 12:57 AM