अकोला : स्थानिक सिंधी कॅम्प आणि खदान मार्गावरील अतिक्रमण रविवारी हटविण्यात आले. अकोला महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई रविवारी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये आणि मार्ग रुंदीकरणाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सातत्याने केली जात आहे. अतिक्रमण हटाव मोहीम रविवारपासून पुन्हा तीव्र झाल्याने महानगरातील अतिक्रमकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. आता महापालिकेची मोहीम कुणीकडे वळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खदानच्या शासकीय गोदामाजवळच्या आणि जेतवन नगर चौकापर्यंतच्या रस्त्याच्या नालीवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेले होते. सदर अतिक्रमण काढण्यासाठी अनेकदा नोटिस बजाविण्यात आल्या; मात्र अतिक्रमकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने रविवारी ही धाडसी कारवाई केली. सिंधी कॅम्प चौकातील झुलेलाल पाणपोई या पथकाने जमीनदोस्त केली. पोलीस प्रशासन आणि परिसरातील नागरिकांनीदेखील महापालिका प्रशासनास स्वयंस्फूर्तीने सहकार्य केले. महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या निर्देशान्वये उपायुक्त समाधान सोळंके, पोलीस निरीक्षक शेख, चव्हाण, खांडेकर, झोन अधिकारी राजेंद्र घनबहादूर, संदीप गावंडे, श्याम बगेरे, राजेंद्र टापरे, संजय थोरात, विजय बडोणे, अॅड. इंगोले यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. गाळेही काढले!शासकीय कार्यालयालगत बांधलेले व्यापारी संकुलचे अतिक्रमित गाळे काढले गेले. या मार्गावर केलेले अतिक्रमण आणि रस्त्यावरील धार्मिक स्थळ काढल्या गेल्याने परिसरात बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या मार्गावरील महान पुरुषांचे पुतळेही कारवाईत काढण्यात आले.
सिंधी कॅम्प मार्गावरील अतिक्रमण हटविले!
By admin | Published: April 24, 2017 1:40 AM