अकोला : गांधी रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मुख्य मार्गावर चक्क रस्त्यावरच ठाण मांडून बसणाऱ्या अतिक्रमकांना हुसकावण्याची थातूरमातूर कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी केली. अतिक्रमकांचे मनपातील काही पदाधिकाऱ्यांसह अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांसोबत मधुर संबंध असल्यामुळे अतिक्रमणाची समस्या कायम राहत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी बाजार मांडला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या गांधी रोड, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, खुले नाट्यगृह ते मदनलाल धिंग्रा चौक, टिळक रोड आदीसह शहराच्या कानाकोपऱ्यात अतिक्रमकांनी ठाण मांडले आहे. परिणामी, अकोलेकरांना रस्त्यावरून वाट काढताना अक्षरश: कसरत करावी लागते. महापालिकेच्या आवारभिंतीलगतची जागा पार्किंगसाठी राखीव असताना प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कापड विके्रता दुकाने थाटतात. हा प्रकार अतिक्रमण विभागाला दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होतो. अतिक्रमण विभागाने गुरुवारी गांधी रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, खुले नाट्यगृह ते मदनलाल धिंग्रा चौकपर्यंतच्या रस्त्यावर बाजार मांडणाऱ्या अतिक्रमकांना हुसकावून लावण्याची कारवाई केली. आॅटोचालकांना पोलिसांचे अभय?गांधी चौक, खुले नाट्यगृह परिसर, सिटी कोतवाली चौकात आॅटोचालकांनी मनमानीच्या बळावर अघोषित थांबे निर्माण केले आहेत. अतिक्रमणाची समस्या कमी म्हणून की काय, त्यामध्ये आॅटोचालकांच्या मनमानी कारभाराने भर घातली आहे. गांधी चौक, सिटी कोतवाली चौकात वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून दुचाकी किंचा चारचाकी वाहनचालकांना दंड आकारला जातो; परंतु त्यांच्या नाकावर टिच्चून उभे राहणाऱ्या आॅटोचालकांना मात्र पोलीस अभय देत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येते.
गांधी रोडवरील अतिक्रमकांना हुसकावले!
By admin | Published: April 21, 2017 2:00 AM