अकोला: राज्यातील कृषी, वाणिज्य व घरगुती ग्राहकांना अखंड व सुलभ वीज पुरवठा व्हावा, यासाठी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या माध्यमातून ऊर्जा विभागाने गत चार वर्षांत केलेल्या प्रगतीचे गुणगान करतानाच, या तिन्ही कंपन्यांनी ग्राहकाभिमुखतेच्या दिशेने मोठी मजल मारली असली, तरी अजून बराच पल्ला गाठणे बाकी असल्याची प्रांजळ कबुली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी शनिवारी येथे दिली.महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना विश्वास पाठक यांनी ऊर्जा विभागाच्या चार वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला. यावेळी अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, ऊजा मंत्र्यांचे माध्यम सल्लागार विवेक जोशी, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, उद्योजक कैलास खंडेलवाल, नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची प्रमुख उपस्थिती होती.विश्वास पाठक पुढे म्हणाले, की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सुलभ वीज पुरवठा करणे, वीज ग्राहकांना कमी दरात वीज पुरवठा करणे, राज्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये वीज पुरवठा करणे यासह इतर उद्दिष्टे ठेवली होती. यासाठी विविधी योजना राबविण्यात आल्या. या उद्दिष्टांपैकी बहुतांश उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत; परंतु अजूनही सुधारणेला वाव असल्याचे पाठक म्हणाले.राज्यात विजेची मागणी वाढत आहे. त्यानुसार सर्वत्र वीज पोहोचविण्यासाठी महानिर्मिती, महापारेषण व महावितरणच्या माध्यमातून काम सुरू आहे. राज्यात गेल्या चार वर्षांत ८१ अति उच्च दाब उपकेंद्र उभारण्यात आली आहेत, तसेच सुमारे ६६७५ सर्किट किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या कार्यान्वित करून पारेषण सक्षम करण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले.विदर्भ-मराठवाड्यातील कृषी पंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्यासाठी गेल्या चार वर्षांत प्राधान्य देण्यात आले. यांतर्गत राज्यात सुमारे साडेचार लाख कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या. वीज गळती थांबविणे व कृषी पंपाला योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी यापुढे उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत मार्च २०१८ अखेरपर्यंत सुमारे अडीच लाख वीज जोडण्या देण्याचे नियोजित असल्याचे पाठक यांनी सांगितले.नियामक मंडळाच्या निर्देशानुसारच शेतकºयांना आठ तास वीजवीज पुरवठ्यासाठी उद्योगांना प्रथम प्राधान्य आहे. वीज नियामक मंडळाने कृषी पंपांसाठी आठ तासांचा वीज पुरवठा निश्चित केलेला आहे. त्यानुसार महावितरणकडून कृषी पंपांना आठ तास वीज पुरवठा केला जातो. यापेक्षा कमी वीज पुरवठा हे भारनियमन ठरते, असे पाठक म्हणाले.ऊर्जा कार्यक्षम कृषी पंप येणार!विजेची बचत करण्यासाठी ऊर्जा विभागाकडून आधी एलईबी बल्ब व पंख्यांची योजना सुरू करण्यात आली. यापुढचा टप्पा आता ऊर्जा कार्यक्षम कृषी पंप असणार आहे, असे पाठक यांनी सांगितले.पुस्तिकेचे प्रकाशनऊर्जा विभागाच्या चार वर्षांतील वाटचालीचा आलेख मांडणारी ‘उदय उज्ज्वल महाराष्ट्राचा-उदय नवीन भारताचा’ ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.