अकोला: पत्नीचा छळ करून तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया अभियंत्याला डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी पुण्यातून अटक केली.डाबकी रोड पोलीस ठाण्यात एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे येथील अभियंता गौरव उदय कुलकर्णी याच्यासोबत तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर तिचे व पतीचे चांगले संबंध होते. दरम्यान, पतीचे युवतीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे पतीने तिचा छळ सुरू केला. तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचा. एवढेच नाही, तर सासरे उदय डिगांबर कुलकर्णी, सासू शुभांगी उदय कुलकर्णी, नणंद प्राजक्ता इनामदार हेसुद्धा मूल होत नसल्यामुळे तिचा छळ करायचे; परंतु कधीतरी हा छळ थांबेल, या आशेने विवाहिता अत्याचार सहन करीत होती; परंतु फेब्रुवारीमध्ये सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर हाकलून दिले. तिच्या तक्रारीनुसार डाबकी रोेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७७, ४९८, ५०६, ५०४, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. विवाहितेची वैद्यकीय तपासणी केली असता अहवालामध्ये पीडितेसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे समोर आले. आरोपी गौरव कुळकर्णी याला अटक करण्यासाठी निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक पुण्याला पाठविले होते. पोलीस पथकाने गौरव कुलकर्णी याला पुणे येथील त्याच्या घरून अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)