लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषद शाळांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली पाहिजे, यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने सातत्याने योजना, प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. इंग्रजी विषयाचे परिपूर्ण ज्ञान आणि इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांना अवगत व्हावी, यासाठी ‘डाएट’च्या माध्यमातून शिक्षकांना इंग्रजी विषयाचे धडे दिले जात आहेत. यासोबतच शिक्षकांना इंग्रजी साहित्य पेटी उपलब्ध करून देण्यात आली असून, आतापर्यंत ४00 शिक्षकांना इंग्रजी विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.शिक्षण विभागाकडून इंग्रजी भाषा अध्ययन पूरक साहित्य संच प्रशिक्षण घेण्यात येत आहे. प्रारंभी राज्य स्तरावर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादमार्फत जिल्ह्यातील पाच तज्ज्ञ मार्गदर्शक यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या पाच तज्ज्ञ मार्गदर्शकांनी जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुक्यातील सहा तालुकास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक यांना तीन दिवसीय प्रशिक्षण दिले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील सहा तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तालुक्यात एका प्रशिक्षण वर्गात प्रत्येक शाळेतील एक शिक्षक याप्रमाणे ५0 शिक्षकांना प्रशिक्षण दिले. जवळपास जिल्ह्यातील ४00 शिक्षकांना इंग्रजी विषयाबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. मार्गदर्शक तज्ज्ञांनी प्रशिक्षणादरम्यान १५ तासिका समजावून सांगितल्या आणि इंग्रजी भाषा अध्ययन पूरक साहित्य संचाचा कसा वापर करावा, याबाबतही माहिती दिली. इंग्रजी विषयाच्या प्रशिक्षणामुळे शाळांमधील इंग्रजी विषयातील गुणवत्ता सुधारण्यास निश्चितच मदत होणार आहे. हे प्रशिक्षण सातत्याने घेणार आहे. विद्यार्थी इंग्रजी विषयामध्ये मागे राहू नयेत, विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. ‘डाएट’चे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ अधिव्याख्याता सागर तुपे विभाग प्रमुख (इंग्रजी विभाग) गटशिक्षणाधिकारी, विषय सहायक संदीप वरणकार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा स्तरावरील आणि तालुका स्तरावरील प्रशिक्षण पार पडले. (प्रतिनिधी)
गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना इंग्रजी विषयाचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 2:04 PM