लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: समग्र शिक्षा व प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद यांच्यावतीने गत दोन वर्षांपासून राज्यभरातील माध्यमिकच्या इंग्रजी विषय शिक्षकांसाठी ‘इंग्लिश स्पिकिंग प्रोग्राम’ राबविण्यात येत आहे. यंदासुद्धा हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांची इंग्रजी विषयातील अध्ययन स्तर निश्चिती करण्यात येणार आहे.‘इंग्लिश स्पिकिंग प्रोग्राम’ या प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या विविध नाविण्यपूर्ण व विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाशी संबंधित संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. चेस ईटीएफ(इंग्लिश टिचर्स फोरम) च्या माध्यमातून इंग्लिश स्पिकिंग इको-सिस्टम हा प्रयोग प्रत्येक शाळेमध्ये यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पाठ्यपुस्तकांचा वापर अधिक प्रभावी करणे, इंग्रजी भाषा शिक्षकांना तंत्रस्नेही अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अवगत करणे, विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी संभाषणकला वाढविण्यास मदत होणार आहे. शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा नियमित वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासंबंधीचे प्रशिक्षण जिल्हा सातत्यपूर्ण शैक्षणिक विकास संस्था यांच्या सहकार्याने होणार आहे. इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळेत राबविलेले प्रयोग आणि त्यातून विद्यार्थ्यांनी अवगत केलेले इंग्रजी विषयाचे ज्ञान पडताळून पाहण्यात येणार आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा अध्ययन स्तर निश्चित करण्यात येणार आहे. ज्या शाळा इंग्रजी विषयात कमकुवत असतील. त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे.जिल्ह्यात हे आहेत तज्ज्ञ मार्गदर्शक‘इंग्लिश स्पिकिंग इको-सिस्टम’बाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी अकोला जिल्ह्यात बहादुरसिंह चौहान, श्रीकांत लाहोळे, योगेश पाचडे, दीपक इंगोले, विनोद वाघमारे, सुभाष इंगळे, प्रमोद राजंदेकर, समाधान भालतिलक, मिलिंद घोगले हे तज्ज्ञ मार्गदर्शक कार्यरत आहेत. जिल्हा सातत्यपूर्ण शैक्षणिक विकास व व्यवसाय मार्गदर्शन संस्थेचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रा. सागर तुपे, विषय तज्ज्ञ संदीप वरणकार यांचेसुद्धा या प्रकल्पास सहकार्य लाभत आहे.
शाळांमध्ये इंग्लिश स्पीकिंग प्रोग्राम राबविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:46 PM