अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अन् वाढत असलेल्या तापमानामुळे मध्यंतरी रक्तसंकलन प्रभावित झाले होते; परंतु गत १५ दिवसांपासून रक्तपेढ्यांमार्फत रक्तसंकलनाच्या विविध पद्धतींचा अवलंब करू लागल्याने रक्तदात्यांनीही प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील महित्त्वाच्या रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयांमधील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. अत्यावश्यक असेल तरच डॉक्टर्स रुग्णांवर शस्त्रक्रिया करत आहेत. त्यामुळे रक्ताची गरज कमी झाली आहे; मात्र दुसरीकडे आवश्यकतेच्या तुलनेत रक्तसंकलन घटले होते. त्यामुळे रक्तपेढ्यांसह रुग्णालयांचीही चिंता वाढली होती. कोरोनासोबतच उन्हाचा पाराही वाढत असल्याने रक्तसंकलनावर विपरीत परिणाम दिसून येऊ लागला होता. अशातच रक्तपेढ्यांनी रक्तसंकलनाच्या पद्धतीमध्ये बदल करायला सुरुवात केली. सुरक्षेची हमी मिळाल्याने रक्तदात्यांनीही पुढाकार घेत रक्तसंकलनासाठी समोर येण्यास सुरुवात केली. रक्तपेढ्यांनी ३० मार्चपासून वेगळ्या पद्धतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केल्याने १५ दिवसांतच परिस्थितीमध्ये बदल दिसू लागला. गत १५ दिवसातच शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठ्याची चिंता संपली. सध्या शहरातील प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध आहे.
जनजागृतीमुळे रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 5:14 PM