तिवसा : गावातील शेतकरी भूमिहीन कुटुंबांचा आर्थिक विकास होण्यासाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सक्रियपणे ‘समृद्ध गाव’ स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपले गाव समृद्ध करावे, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुभाष नानवटे यांनी केले. तिवसा ग्रामपंचायत कार्यालयात पाणी फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित विहीर पाणीपातळी मोजमाप कार्यशाळेत ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी सरपंच गजानन लुले पाटील होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बार्शीटाकळीचे तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, गटविकास अधिकारी किशोर काळपांडे, सहायक गटविकास अधिकारी रमेश चव्हाण, पाणी फाउंडेशनचे तांत्रिक प्रशिक्षक सुमित गोरले, विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, स्वच्छ पेयजल विभागाचे डहाके, संघपाल वाहुरवाघ, तालुका समन्वयक विद्या आकोडे उपस्थित होते. प्रारंभी कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर समृद्ध स्पर्धेचे प्रास्ताविक तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ यांनी केले. तहसीलदार डॉ. येवलीकर यांनी समृद्ध गाव स्पर्धेविषयी माहिती सांगितली. स्पर्धेसाठी गावकऱ्यांनी तयारी करावी, असे आवाहन किशोर काळपांडे यांनी केले. यानंतर समृद्ध गाव स्पर्धेत विहीर पाणीपातळी कशी मोजावी, याबाबतची कार्यशाळा सुमित गोरले यांनी उपस्थितांना समजावून सांगितली व विहिरीवर जाऊन प्रत्यक्षात विहीर पाणीपातळी मोजमाप प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यशाळेला बार्शीटाकळी तालुक्यातील समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, रोजगारसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी ग्रामपंचायत, वॉटर हीरो व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्या आकोडे यांनी केले, तर आभार सरपंच गजानन लुले पाटील यांनी मानले.
समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होऊन गाव समृद्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:19 AM