- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: उत्तर भारतातील श्रीराम जन्मभूमी ते दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत श्रीरामनवमीला रामजन्म सोहळा उत्साहात साजरा केला जातो. शहरात मोठे राममंदिर, छोटे राममंदिर, बिर्ला राममंदिरात चैत्राच्या आगमनापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असल्याने भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. शनिवारी चैत्र शुद्ध नवमीला साजरा होत असलेल्या रामजन्म सोहळ्यासाठी रामभक्तांची पूर्वतयारी पूर्णत्वास आली आहे.चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवसाला रामनवमी म्हणतात. वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातील हा सर्वात मोठा उत्सव. दुष्ट शक्तींना ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना त्राही करू न सोडले, तेव्हा दुष्ट शक्तींच्या निर्दालनासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र होय, असे रामायण ग्रंथात सांगितले आहे.सामाजिक व सांस्कृतिक महत्त्वरामकथा परंपरेने भारताच्या जवळपास सर्वच भाषांमध्ये आहेत. रामनवमीच्या निमित्ताने या रामकथांचे पठण केले जाते. भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केल्या जातात. ‘काळाराम मंदिर’ सत्याग्रहामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही रामनवमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात संगीतकार सुधीर फडके आणि गीतकार ग़. दि. माडगुळकर यांच्या गीत रामायणामुळे रामायणातील प्रत्येक प्रसंग घराघरांत मुखोद्गत झालेला आहे. गीत रामायणातील आलंकारिक शब्दांनी मराठी मनामध्ये रामायणाचे आणि रामनवमीचे महत्त्व बिंबविले आहे. बाबूजी आणि गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यावर्षी संस्कार भारतीने अवघ्या महाराष्ट्रात गीत रामायणाचे कार्यक्रम सादर करीत आहेत.