अकोला : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकमत परिवाराच्या पुढकाराने बुधवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आले. या प्रसंगी लोकमत परिवारातील सदस्य, एचडीएफसी बँकेचे अधिकारी-कर्मचारी, शहर वाहतुक शाखेचे कर्मचारी, परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांमधील सहकारी व अकोलेकर सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्व नागरिकांनी समूह राष्ट्रगीताचं गायन करावे. यामध्ये राज्यातील शासकीय, खासगी तसेच इतर सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये स्थानिक शिक्षण संस्था, विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थी यामध्ये सहभागी व्हावेत. खासगी अस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने यांनीही यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारने केले होते. याबाबत एक परिपत्रकही काढण्यात आले. या आवाहनाला अकोला लोकमत परिवार व परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांनी प्रतिसाद देत बुधवारी सकाळी ११ वाजता लोकमत कार्यालयासमोर राष्ट्रगीताचे सामुहिक गायन केले. यावेळी लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, युनिट हेड आलोककुमार शर्मा, एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक सागर पारखडे, शहर वाहतुक शाखेचे प्रमुख विलास पाटील व वाहतुक शाखेतील कर्मचारी सहभागी झाले होते. राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय आणी वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
राष्ट्रगीतासाठी एसटीची चाके थांबली
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभाागाअंतर्गत अकोला आगार क्र. २ येथे बुधवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामुहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती बसस्थानकावर उपस्थित असलेल्या शेकडो प्रवाशांनी आपल्या जागेवर उभे राहून एकासुरात राष्ट्रगीताचे गायन केले.
जिल्ह्यातही ठिकठिकाणी राष्ट्रगीत गायन
जिल्ह्यात निंबा फाटा येथे ग्रामस्थांनी रस्त्यावर एकत्र येत राष्ट्रगीत गायले. इतरही ग्रामपंचायतींमध्ये असे कार्यक्रम पार पडले. अकोला मध्यवर्ती बसस्थानकावरही सकाळी ११ वाजता सर्व अधिकारी-कर्मचारी व प्रवाशांनी सामुहिकपणे राष्ट्रगीत गायले. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, महानगर पालिका, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस मुख्यालय यासह विविध शासकीय कार्यालये तसेच शाळा-महाविद्यालयांमध्येही राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आले.