लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या जलयुक्त शिवाराच्या कामांचा यामुळे लाभ होणार आहे.तसेच पेरणी राहिलेल्या क्षेत्रात आता पेरण्याना वेग येणार.बार्शीटाकळी तालुक्यात ३८.२५ मि.मी. पाऊसबार्शीटाकळी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून, धाबा महसूल मंडळाच्या गावामध्ये १९ जुलैच्या सायंकाळपासून २० जुलैच्या सकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.तालुक्यात दोन दिवसात बार्शीटाकळी-५३ मि.मी.,धाबा-६७ मि.मी., महान-३८ मि.मी., पिंजर-२७ मि.मी., खेर्डा-१८ मि.मी., राजंदा- २८ मि.मी असा सरासरी ३८.२५ या प्रमाणे महसुली मंडळनिहाय पाऊस पडला आहे. जूनच्या पंधरवड्यानंतर तालुक्यात बऱ्याच प्रमाणात खरिपच्या पेरण्या सुरू झाल्या होत्या. पासाने खंड पडल्याने पेरण्या उलटल्याने दुबार पेरण्या झाल्या. सर्वाधिक दुबार पेरण्या धाबा, चोहोगाव, सायखेड, जाम वसू, किनखेड, साखरविरा, कोथळी, राजनखेड, निंबी, पुनोती, लोहगड, वरखेड, देवदरी, शेलगाव, चेलका आदी ठिकाणी झाल्या. पुन्हा पावसाने हुलावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. पेरणी केलेले बियाणे कमी प्रमाणात अंकुरले. काहींनी शेतात तिबार पेरणी केली तर काहींनी अंकुरलेल्या पिकांवर समाधान मानले. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने काही शेतकरी आनंदित झाले. तालुक्यात अजूनही शेकडो एकर शेतजमीन पडीक असल्याचे चित्र दिसून येत आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात झालेल्या कामांना या पावसाचा थोडाफार लाभ झाला असून, पाणी पातळी वाढत आहे. पातूर तालुक्यात २५ मि.मी. पाऊसयेथे १९ जुलै रोजी पातूर शहरासह पातूर, आलेगाव, बाभूळगाव, चान्नी व सस्ती या पाच ठिकाणी एकाच रात्री २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये पातुरात २५ मि.मी., आलेगाव ४ मि.मी., बाभूळगावात ३५ मि.मी., चान्नीला ९ मि.मी. व सस्ती येथे १४ मि.मी. अशी एकूण एकाच रात्री २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर संपूर्ण पातूर तालुक्यात पावसाळा सुरू झाला तेव्हापासून आत्तापर्यंत २९३.५० मि.मी. एवढी एकूण पावसाची नोंद झाली असल्याचे तहसील सूत्राचे म्हणणे आहे, तसेच आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यानसुद्धा पातुरात तुरळक प्रमाणात पाऊस पडला आहे. बाळापूर तालुक्यात१९.१४ मि.मी. पाऊसबाळापूर तालुक्यात १९ जुलै रोजी १९.१४ मि.मी. पाऊस पडला. यात बाळापूर मंडळात ०८ मि.मी., वाडेगाव-०५ मि.मी., पारस-११ मि.मी., उरळ -१२ मि.मी., हातरूण-२३ मि.मी., निंबा-५९ मि.मी., व्याळा मंडळात १६ मि.मी. पाऊस पडला. मूर्तिजापूर तालुक्यात ३० मि.मी.पाऊसमूर्तिजापूर तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस पडला नसल्यामुळे पेरणी झालेली पिके संकटात सापडली आहे. शेतकऱ्यांना पूरक पावसाची प्रतीक्षा आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे; मात्र सदर पाण्यामुळे पिकांची वाढ होण्यात मदत होऊ शकत नाही. जमिनीत अद्यापही पावसाचे पाणी पुरेशा प्रमाणात मुरले नाही. त्यामुळे जमिनीत आजही उष्णता कायम असल्याने पिकांना एकप्रकारे धोकाच आहे. रिमझिम पाण्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला; परंतु अशा पावसामुळे पिकांची वाढ होणे अशक्य आहे. मूर्तिजापूर तालुक्यात बहुतांश भागात दमदार पाऊस पडला तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. अनेक भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. वेळीच दमदार पाऊस न पडल्यास पिकांची वाढ खुंटणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.तालुक्यात अजूनही ३० ते ४० टक्के क्षेत्रावर पेरणी होणे बाकी असल्याची माहिती आहे. मूर्तिजापूर तालुक्यात १९ जुलैपर्यंत ३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; मात्र अल्पशा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भवितव्य सध्यातरी अधांतरीच आहे.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:18 AM