शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी भाेड येथील १९ एकर जमिनीत प्रकल्प उभारला जाणार आहे. तत्पूर्वी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातून निघणारी माती, प्लास्टिक, काचाचे तुकडे वेगळे करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या कामाला कंत्राटदाराने सहा महिन्यांपूर्वी सुरुवात केली. घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात असतानाही कचरा संकलन करणाऱ्या वाहन चालकांना कचरा साठवणुकीसाठी जागा का उपलब्ध नाही, असा सवाल उपलब्ध झाला. याप्रकरणी कंत्राटदाराच्या दाेन काेटींच्या देयकासाठी जीवाचा आटापिटा करणारे बांधकाम विभागातील अधिकारी, उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी कचरा संकलन करणाऱ्या वाहन चालकांच्या अडचणींकडे पाठ फिरवणे पसंत केले. त्यामुळे चालकांनीही कचरा जमा करणे बंद केले. परिणामी ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या कानाकाेपऱ्यात घाणीचे साम्राज्य निर्माण हाेऊन अकाेलेकर साथराेगांनी बेजार झाले आहेत. या बाबीची मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी गंभीर दखल घेत शनिवारी सकाळी नगरसचिव तथा आराेग्य व स्वच्छता विभाग प्रमुख अनिल बिडवे, प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर यांच्यासह डम्पिंग ग्राउंड व कचऱ्यावर हाेणाऱ्या प्रक्रियेची पाहणी केली असता, बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांची पाेलखाेल झाली.
घनकचऱ्याची प्रक्रिया ठप्प
मे. परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीकडून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून या ठिकाणी कचऱ्याचे सहा ते सात ढीग असल्याची माहिती यावेळी आयुक्तांना देण्यात आली. त्यावर आयुक्तांनी स्वीय सहायकांना कचऱ्याच्या ढिगावर चढून पाहणी करण्याचे निर्देश दिले असता कचऱ्याचा केवळ एकच ढीग असल्याचे समाेर आले.
...तरीही साडेचार मीटर रस्त्याचे निर्माण
डम्पिंग ग्राउंडवर साचलेले कचऱ्याचे ढीग, कचरा साठवणूक करणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध नसणे, बंद पडलेली जेसीबी मशीन यांसह अनेक बाबी आयुक्त द्विवेदी यांच्या निदर्शनास आल्या. प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर यांसह उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी दिलेल्या अर्धवट व अपूर्ण माहितीमुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. वाहनांसाठी प्रशस्त रस्ता तयार करा, त्याचे देयक कंत्राटदाराकडून वसूल करण्याचे निर्देश दिल्यानंतरही बांधकाम विभागाने अवघ्या साडेचार मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित केला, हे विशेष.