अकोला : शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर कामबंद आंदोलन करीत असून शुक्रवारी या आंदाेलनस्थळी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी भेट दिली. या आंदोलनात ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी परिचारिका, जीएनएम एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनएचएमअंतर्गत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. १६ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते. मात्र सरकारला गांभीर्याने विचार करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी, संघटनेने १६ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय राज्यव्यापी आंदोलन नागपूर येथे केले हाेते.
याची दखल न घेतल्याने २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत कृती समितीने घोषणा दिल्या व आंदोलन केले. यावेळी समन्वयक डॉ. राजू नागे, गोपाल अंभोरे, सचिन उनवणे, मनोज कडू, मो. इम्रान, उमेश ताठे, डॉ. अनुप्रताप जयराज, अंकुश गंगाखेडकर, भावना गवई, महेंद्र कोलटक्के, डॉ. जाकीर अहेमद, डॉ. मनीष ठाकरे उपस्थित होते.राज्यव्यापी आंदाेलनात १८ हजारांवर कर्मचारीआंदोलनात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आराेग्य अधिकारी कार्यालय, डीडब्ल्यूएचमधील ५०० आणि एनयूएचएमचे १६० असे एकूण ६६० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले हाेते. यामध्ये एनएचएमच्या १५ संवर्गातील अधिकारी, कर्मचारी आहेत. ३०, ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित आंदोलनात राज्यभरातील सुमारे १८ हजारांवर कर्मचारी सहभागी होणार आहेत.