अकोला : पूर्व विदर्भातील नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पाच जणांचे बळी घेऊन थैमान घालणाऱ्या स्क्रब टायफस या कीटकजन्य आजाराचा संसर्ग वाढत असून, अकोल्यातील एका युवकालाही या आजाराची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले. सदर तरुणावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अकोल्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.शिवाजी पार्क भागातील एका २८ वर्षीय तरुणाला स्क्रब टायफस सारखी लक्षणे दिसून आल्यानंतर उपचार करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी त्याच्या अंगावर व चेहºयावर पुरळ आल्याचे निदर्शनास आले. तेथे प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी युवकाला २१ आॅगस्ट रोजी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले. त्या ठिकाणी चाचणी केली असता, त्याला इतर स्क्रब टायफस हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर तरुणावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्याला सुटी होणार असल्याचे त्याच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नागपूर ‘जीएमसी’ला १८ रुग्णनागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या आजाराचे १८ रुग्ण दाखल झाले होते. यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १३ रुग्णांपैकी पाच रुग्ण अद्यापही भरती असून, यामध्ये अकोल्यातील एका २८ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.आरोग्य विभाग ‘हाय अलर्ट’वरआजाराबाबत प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग), पुणे यांच्याकडून देण्यात आले आहेत. अकोल्यात स्क्रब टायफसचा रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य सेवा, अकोला मंडळ उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग कामला लागला आहे. उपाययोजना म्हणून शहरातील शिवाजी पार्क भागात सर्वेक्षण करून, फवारणी करण्यात आली.काय आहे स्क्रब टायफस?स्क्रब टायफस हा एक कीटकजन्य आजार असून, कीटकाच्या चावल्याने हा आजार होतो. या आजाराची लक्षणे चिकनगुनियासारखी असून, हा आजार जलद गतीने वाढणारा आहे. योग्य वेळात निदान झाले नाही, तर ४० ते ५० टक्के मृत्यूची शक्यता असते.स्क्रब टायफसची लक्षणेथंडी वाजून तीव्र ताप येणे.डोकेदुखी व सांधे दुखी.शरीराला कंप सुटणे.कीटक चावलेल्या ठिकाणी खाज, पुरळ, चट्टे येणे.प्रतिबंधात्मक उपायसाफसफाईची दक्षता घ्यावी.घराच्या आजूबाजूला वाढलेले गवत, झाडे-झुडपे तोडावी.पाळीव प्राण्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.पूर्ण शरीर झाकल्या जाईल, असे कपडे घालावे.अकोल्यातील युवक स्क्रब टायफसची लागण झाली असून, त्याच्यावर नागपूर जीएमसीमध्ये उपचार सुरु आहेत. तो राहत असलेल्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- डॉ. अभिनव भूते, सहायक संचालक, आरोग्य सेवा (हि.) अकोला.