अकोला: सेवानिवृत्त कामगारांच्या हक्काच्या सेवानिवृत्ती वेतनप्रकरणी प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीने शुक्रवारी अकोल्यातील पीएफ कार्यालयात हल्लाबोल आंदोलन केले. शेकडोंच्या संख्येत जमलेल्या आंदोलकांनी आधी तापत्या उन्हात दोन तास धरणे दिले. त्यानंतर थेट आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल केला. आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी समयसूचकता दाखवत मध्यस्थी केली आणि तणाव निवळला.स्थानिक सिव्हील लाईन चौकातील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासमोर सकाळी दहा वाजतापासून शेकडो आंदोलकांनी धरणे देण्यास सुरूवात केली. संघर्ष समितीचे अध्यक्ष ब्रिगेडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आले. शेकडोंच्या संख्येत पेन्शर्स ४५ सेल्सीअस डीग्रीच्या उन्हात धरणे देत असतानाही त्यांच्याकडे भविष्यनिर्वाह निधीच्या अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. अखेर शेकडो आंदोलकांनी नारेबाजी करीत आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि पेन्शनर्स समोरासमोर झाल्याने नारेबाजी आणि धक्काबुक्की सुरू झाली. शेकडोंचा जमाव भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाचा ताबा घेऊ पाहात असल्याने येथे उपस्थिती असलेल्या पोलिसांनी ही बाब वरिष्ठांना सांगितली. तोपर्यत नारेबाजी करणारे आंदोलक अधिकच संतप्त झाले. दरम्यान सिव्हील लाईन पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद ठाकरे, सीटी कोतवालीचे निरीक्षक विलास पाटील, आणि सोबतच अकोला शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील तातडीने तातडीने घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी विनंती करून शिष्टमंडळाची वरिष्ठ अधिकाºयांसोबत चर्चा घडवून आणल्यानंतर परिस्थिती आली.३१ मे २०१७ च्या बदलानुसार,सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये सेवानिवृत्त कामगारांना निवृत्ती वेतन देण्यात यावे, कमीतकमी ७५०० रूपये आणि डीए देण्यात यावा, ईपीएस ९५ च्या सर्व सेवानिवृत्तीधारकांना निशुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात याव्यात, जे ईपीएस ९५ चे सदस्य नसतील अशांना देखिल सामावून घेण्यात यावे नाहितर त्यांना पाच हजार रूपये निवृत्ती वेतन देण्यात यावे. अशा चार मागण्या येथे करण्यात आल्यात. यावेळी अकोल्याचे अध्यक्ष पागृत यांच्यासह अकोला, वाशीम,बुलडाणा, यवतमाळ येथील शेकडो पेन्शनर्स प्रामुख्याने उपस्थित होते.
ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या आंदोलकांचा पीएफ कार्यालयावर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 5:57 PM