अकोला: जिल्ह्यातील बेघर तसेच भिकाऱ्यांसाठी ४०० व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था असलेले सुसज्ज बेघर निवारा केंद्र उभारणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शनिवारी येथे दिली. शहरातील अकोट फैल येथील महानगरपालिका अंतर्गत आशाकिरण महिला विकास संस्थाव्दारा संचालित संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्राला भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, आशाकिरण महिला विकास संस्थेच्या दुर्गा भड, महानगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे उपस्थित होते.
शहरातील भिक्षेकरी व्यक्तींना निवारा मिळवून देण्यासाठी मनपा, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्यवतीने येत्या सोमवारपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात असलेल्या १३७ भिक्षेकरी व्यक्तींना एकत्र करुन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील बेघर व्यक्तींची आस्थेने विचारपूस करुन पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्यासोबत अल्पोपहार केला.
बेघर निवारा केंद्र
उभारणीसाठी जागेची पाहणी!
अकोला शहरातील रामदासपेठ पोलिस स्टेशन जवळील मनपा शाळा क्र.४ येथे पालकमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन सुसज्ज बेघर निवारा केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. ४०० बेघर व भिकारी व्यक्तींच्या निवाऱ्यासाठी सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध असून, आवश्यकता पडल्यास जिल्हा वार्षिक निधीतून निधी उपलब्ध करण्यात येईल, असे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.
.........................फोटो......................