केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे आणि नवीन आठ जलकुंभ उभारणीच्या कामासाठी मनपाने एपीअँडजीपी कंपनीला कार्यादेश दिले आहेत. कंपनीने सात जलकुंभ उभारले असून, जुने शहरातील डाॅ. आंबेडकर मैदानलगतच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याचे समाेर आले आहे. जलकुंभाच्या उभारणीला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध असून, या ठिकाणी जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धाकदपट करून हाकलून लावण्यात आल्याचा प्रकार घडला होता. स्थानिक रहिवाशांच्या विरोधासमोर मनपा प्रशासन हतबल ठरत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पाेलिसांकडून ‘तारीख पे तारीख’
स्थानिक रहिवाशांचा विराेध लक्षात घेता मनपाने सुरक्षेसाठी पाेलीस बंदाेबस्ताची मागणी केली असता पाेलीस ठाण्यातून ‘तारीख पे तारीख’दिली जात आहे. यामुळे पाेलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
मजीप्राने साधली चुपी; अहवाल का नाही?
अमृत अभियानमधील भूमिगत गटार योजना व पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली आहे. या दोन्ही योजनांच्या कामाच्या मोबदल्यात मजीप्राला तीन टक्के रक्कम अदा केली जाणार आहे. मागील दाेन वर्षांपासून जलकुंभाच्या उभारणीला विलंब होत असतानाही मजीप्राने यासंदर्भात मनपाला अहवाल का दिला नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
डाबकी रोड येथील जलकुंभाच्या उभारणीला विलंब झाल्याची बाब मान्य आहे. स्थानिक रहिवाशांचा निरर्थक विरोध आहे. कामाला सुरुवात करण्यासाठी पाेलिसांकडे सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे.
- सुरेश हुंगे ,कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, मनपा