अकोला: जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळांच्या तपासणीत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून येत आहेत. त्यामुळे शालेय अभिलेखे काळजीपूर्वक लिहिण्याचे निर्देश जिल्हास्तरीय तपासणी पथकाने दिला आहे. तपासणी दरम्यान आढळून आलेल्या त्रुटींबाबतचाही अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांची तपासणी करण्यात येत आहे.समाजातील प्रत्येक घटकाला समान शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, यासाठी विविध शैक्षणिक योजना राबवून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावत आहे. विद्यार्थी संख्येअभावी शाळा ओस पडत आहेत. शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून शैैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळांमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक दर्जा, शिक्षण, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची तपासणी जिल्हास्तरीय तपासणी पथकामार्फत करण्यात येत आहे. हे पथक शाळांना भेट देऊन तपासणी करीत आहे.
पथकाच्या पाहणीत काय आढळले?जिल्हास्तरीय तपासणी पथकाद्वारे शुक्रवारी पातूर तालुक्यातील दिग्रस बु., पिंपळखुटा व बाळापूर तालुक्यातील देगाव, वाडेगाव या केंद्र शाळांना भेट देऊन तपासणी करण्यात आली.देगाव केंद्र शाळेने लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले आहेत. हेल्प बॉक्स, इंग्रजी वाचनासारखे उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांची प्रगती चांगली असून, शालेय अभिलेखे काळजीपूर्वक लिहावेत, असेही निरीक्षण पथकाने नोंदवले. वाडेगाव केंद्र शाळेतील शिक्षकांनी केंद्रप्रमुख यांच्या सूचनांचे पालन करण्याचे सांगण्यात आले. गणित इंग्रजी पेटीचा वापर वाढविणे गरजेचे आहे. परिसर स्वच्छ असून, शालेय शिस्त चांगली आहे. विद्यार्थी प्रगती चांगली असून, शाळा व्यवस्थापन समितीचे उत्तम सहकार्य असल्याचेही दिसून आले.दिग्रस केंद्र शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळा समितीच्या बैठकीत प्रत्येक विषय वाचून दाखवावा. विद्यार्थी नोंदी पूर्ण कराव्यात, कृतीयुक्त अध्यापन पद्धतीचा वापर करून विद्यार्थी प्रगती खूप छान केली आहे, असेही मत पथकाने नोंदविले. पिंपळखुटा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. अवांतर पुस्तकांचे वाचन जास्त करावे, विद्यार्थी प्रगती चांगली असल्याचेही पथकाच्या तपासणीत दिसून आले.त्रुटींची पूर्तता करून अहवाल द्यावा!तपासणी नमुन्यानुसार सर्व बाबींची पडताळणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच त्रुटींची पूर्तता करून जिल्हा कार्यालयाला लेखी अहवाल सादर करण्याच्या सूचना पथकाने दिल्या आहेत. चारही केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, सदस्यांशी चर्चा करून शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपासणी पथकामध्ये उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे, अधिव्याख्याता कविता बोरसे, वरिष्ठ सहायक नितीन सुदालकर, सीएम फेलो शुभम बडगुजर व जिल्हा समन्वयक प्रशांत अंभोरे यांचा समावेश होता.