बाळापूर : तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, गत तीन महिन्यांमध्ये ५४ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने वाढत असून, तालुक्यात गत दहा दिवसांत २६२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक होत असताना या वाहनचालकांवर अद्याप कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. तसेच प्रवासी विनामास्क प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळेच तालुक्यात कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनामार्फत कडक कारवाई होत नसल्याने वाहनधारक बिनधास्त अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------
११ वाजेनंतरही दुकानांमध्ये गर्दी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, शहरातील अत्यावश्यक सुविधा असलेली दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही ११ वाजेनंतरही काही दुकाने सुरूच राहत असून, दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र आहे. पोलीस दुकाने बंद करण्यासाठी ११ वाजता फेरफटका मारतात. पोलीस निघून गेल्यानंतर दुकाने पुन्हा सुरूच राहत असल्याचे चित्र आहे.
-----------------------------
ग्रामीण भागात मृत्यूंची संख्या अधिक
गेल्या तीन महिन्यांत शहरातील ७ तर ग्रामीण भागातील ४७ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
------------------------------
अवैध प्रवासी वाहतूक फोफावली!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा बंद असल्याने याचा गैरफायदा अवैध प्रवासी वाहतूकदार घेत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रवासी विनामास्क प्रवास करीत असताना दिसून येत आहेत. तसेच अवैध प्रवासी वाहतूकदार प्रवाशांकडून जादा दराने भाडे वसूल करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.