लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मुंबई येथील क्रांती मैदानावर ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अंतिम लढय़ाची घोषणा केली. ‘करा किंवा मरा’ असा संदेश दिला. त्यामुळे महात्मा गांधींना अटक झाली आणि त्यांच्या अटकेचा निषेधार्थ भारतीयांनी क्रांतीचा हुंकार फुंकला. क्रांतीच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्याचे लोण अकोल्यातही पसरले होते. मोर्चा, सत्याग्रह, चले जाव आंदोलनाने अकोला शहर दणाणून गेले होते. तो काळ अविस्मरणीय, प्रेरणादायी होता. अकोल्यातील ऑगस्ट क्रांती लढय़ामध्ये स्वातंत्र्यसेनानी स्व. अच्युतराव देशपांडे, स्व. प्रमिलाताई ओक, मुनी गुरुजी, लक्ष्मणराव गोडबोले, हिरुळकर गुरुजी, देवीदासजी गरड आदी त्याकाळातील स्वातंत्र्यसंग्रामातील धडाडीचे नेते होते. स्वातंत्र्यासाठी अनेक काळ या सर्व नेत्यांनी काही तुरुंगवास भोगला. स्व. प्रमिलाताई ओक, विमलताई देशपांडे यांच्या नेतृत्वात प्रभातफेर्या, राष्ट्रीय झेंड्याची मिरवणूक, पत्रके वाटण्याचे काम केले. १३ ऑगस्ट १९४२ साली. क्रांती लढय़ाचा सर्वात मोठा मोर्चा निघाला. त्यात महिला अग्रभागी होत्या. या महिलांनीच काँग्रेस मैदान (आताचे स्वराज्य भवन) येथे राष्ट्रीय झेंडा फडकवण्याचा प्रयोग झाला. पोलिसांनी बलाचा वापर करून लाठीमार केला. महिलांच्या मोर्चावर लाठीमार केल्याने लोक खवळले होते. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी क्रूर लाठीमार केला. अनेक लोक जखमी झाले. यात अनेक स्वातंत्र्यसेनानींना अटक झाली होती. स्वातंत्र्यसेनानी देवीदास गरड यांनी साथीदारांच्या मदतीने त्यांच्या घरातच बॉम्बची निर्मिती केली होती; परंतु बॉम्ब बनविण्यामध्ये काही त्रुटी राहिल्याने, बॉम्बचा अचानक स्फोट झाला. त्यात देवीदास गरड आणि त्यांचे काही साथीदार गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर ब्रिटिशांनी गरड यांना अटक केली होती. त्या काळी वाडेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सभा झाली होती. भाटे क्लबच्या मैदानावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सभा घेऊन नागरिकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची जाज्वल्य भावना निर्माण केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोससुद्धा त्यादरम्यान अकोल्यात येऊन गेले. त्या काळी तर टिळक राष्ट्रीय शाळासुद्धा क्रांती लढय़ाचा एक भाग बनली होती. टिळक राष्ट्रीय शाळेतून अनेक विद्यार्थी क्रांती लढय़ात सहभागी झाले होते.
सुखदेव, राजगुरूंनी घेतला होता आश्रय स्वातंत्र्यलढा तीव्र करण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्यसेनानी अकोल्यात येऊन गेले. महान स्वातंत्र्यसेनानी सुखदेव, राजगुरू यांची धरपकड करण्यासाठी ब्रिटिशांनी मोहीम अधिक तीव्र केली होती. उत्तर भारतात राहणे असुरक्षित होते. या कारणामुळे सुखदेव, राजगुरू यांना काही स्वातंत्र्यसैनिकांनी अकोल्यात आश्रय दिल्याची नोंद आहे.