अकोला : 'आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो। प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो। उदो बोला अंबाबाई माउलीचा हो।' या उद्घोषात, ढोल-ताशांच्या गजरात आदिशक्ती, आदिमायेच्या शहरातील नवदुर्गा उत्सव मंडळांनी मंगळवारी भक्तिमय वातावरणात स्थापना केली. घरोघरीदेखील नवरात्रोत्सवाची घटस्थापना करण्यात आली. नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कौलखेड, आकोट फैल, गुलजारपुरा, जयहिंद चौक, जठारपेठेतील ज्योतीनगर, डाबकी रोड आदी ठिकाणच्या मूर्तिकारांकडे मूर्ती घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. मूर्तिकारही मूर्तीला श्रुंगार, साडी-चोळीसह सजवून देवींना निरोप देत होते. शहरात आकर्षक मंडप उभारण्यात आले असून, विद्युत रोशणाईसुद्धा केली आहे. अनेक मंडळांनी विविध सामाजिक संदेश देणारे देखावे, चित्ररथसुद्धा उभारले आहेत. महिला, तरुणींनीसुद्धा राऊतवाडी, गांधी रोड, जयहिंद चौक, लोखंडी पूल, सिटी कोतवाली चौक परिसरात शारदामातेची मूर्ती घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतून मंडळाचे कार्यकर्ते चारचाकी वाहने घेऊन मूर्ती नेण्यासाठी शहरात आले होते; ढोल-ताशे, वाद्यांच्या गजरात आणि 'जय माता दी', ह्यअंबा माता की जयह्णच्या जयघोषात मूर्ती नेताना दिसून येत होते. नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठही दुर्गाभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. बाजारात देवीची ओटी भरण्याचे साहित्य, खण-नारळ, साडी-चोळी आदी साहित्य विक्रीस उपलब्ध होते. आता नऊ दिवस आदिशक्तीच्या भक्तीचाच गजर राहणार आहे.
भक्तिमय वातावरणात आदिशक्तीची स्थापना
By admin | Published: October 14, 2015 1:32 AM