अवैध जाेडणी; पाण्याचा उपसा
अकोला : शहराच्या विविध भागांत अवैधरीत्या नळजोडणी घेण्यात आली आहे. पाेळा चाैकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या नळजाेडणी घेऊन त्यामाध्यमातून दिवसभर पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असतानाही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.
पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण
अकोला : मनपा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण उभारण्यात आल्यामुळे अकाेलेकरांची गैरसाेय हाेत आहे. प्रशासनाने ही समस्या दूर करण्याची गरज आहे. नागरिक नाईलाजाने त्यांची वाहने रस्त्यावर उभी ठेवत असल्याने वाहतुकीची काेंडी हाेत आहे.
जलवाहिनी फुटली
अकोला : रतनलाल प्लाॅट चाैक परिसरातील जलवाहिनीचा व्हाॅल्व्ह निकामी झाल्यामुळे पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत असल्याचे शनिवारी दिसून आले. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आराेग्याला धाेका निर्माण हाेत असताना मनपाचा जलप्रदाय विभाग झाेपेत असल्याचे चित्र आहे.
स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेचा अभाव
अकाेला : महापालिकेत पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असले तरी त्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी नसून अस्वच्छता असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. ही बाब गांभीर्याने घेत प्रशासनाने तातडीने स्वच्छतागृहांमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
क्षयराेग विभाग वाऱ्यावर
अकाेला : शहरात महापालिकेच्या अखत्यारित मुख्य पाेस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या क्षयराेग विभागाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समाेर आले आहे. आवारभिंतीला प्रवेशद्वार नसल्यामुळे ऑटाेचालक, रिक्षाचालक व अनेकदा भिकाऱ्यांचा या परिसरात वावर दिसून येताे. याठिकाणी मनपाने चाैकीदार नियुक्त करण्याची गरज आहे.
सिमेंट रस्त्याची दुरुस्ती नाहीच !
अकाेला : शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या माळीपुरा चाैक ते नूतन हिंदी विद्यालयापर्यंतच्या सिमेंट रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहिन असून, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी अकाेलेकर करीत आहेत. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.
भंडारा येथील घटना दुर्दैवी !
अकाेला : भंडारा येथील हाॅस्पिटलमधील घटनेत नवजात बालकांचा झालेला मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. याप्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन दाेषींवर कारवाई करण्यासाेबतच पीडित कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडे केली आहे.